छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारावे वंशच छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते.
सातारा जिल्ह्यात ज्यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले त्यावेळी राजघराण्यातील वैरत्व संपवण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळं सातारा राजघराणे आणि सातारकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांचं वृध्दापकाळाने निधन झालं आहे. पुणे येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सायंकाळी ५.४५ वाजता प्राणज्योत मालवली. शिवाजीराजे भोसले यांचे पार्थिव रात्री उशिरा अदालत वाडा येथे आणला जाणार आहे त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत.
शांत संयमी सुसंस्कृत व आपल्या साधेपणाने ओळखले जाणारे सातारचे राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४७ साली झाला. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी सलग सहा वर्ष शाहू नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकीर्द गाजवली.
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना खेळाविषयी प्रचंड आवड होती. त्यामुळेच महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. तसेच शिक्षण क्षेत्रात ही आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. शिवतेज माध्यमिक विद्यालय, आरे या संस्थेच्या उल्लेखनीय कार्यात त्यांचं मार्गदर्शन नेहमी असायचं.
शिवाजीराजे हे गेली ७५ वर्षे साताऱ्यातील अदालतवाडा येथे राहात होते. अदालत वाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून परिचित होता. आजही या वाड्यातून दिलेला शब्द तसेच आदेश सातारकर सन्मानपुर्वक स्वीकारतात.






