सध्या पावसाला सुरूवात झाली आहे. पाऊस आणि हलक्या थंडीत काही लोक मोमोज खाण्यासाठी पसंती देतात. शहरी भागात मोमोज हे एक लोकप्रिय स्ट्रीट फूड बनत आहे. मात्र हेच मोमोज एका व्यक्तीने खाल्ले आणि त्याचा मृत्यू झाल्याची घटन घडली आहे. त्यामुळे आता तज्ज्ञांनी देखील मोमोज खाताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मद्यधुंद व्यक्तीला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) मध्ये मृत आणण्यात आले. पोस्टमॉर्टममध्ये, सीटी स्कॅनचा वापर करून, त्याच्या श्वासनलिकेच्या किंवा विंडपाइपच्या सुरुवातीला एक मोमो अडकल्याचे समोर आले. नीट चावून न खाल्ल्यामुळे गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत आहे.
हा अहवाल जर्नल ऑफ फॉरेन्सिक इमेजिंगच्या ताज्या आवृत्तीत प्रकाशित करण्यात आला आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, हे निष्कर्ष वैद्यकीय मतांसाठी खूप महत्त्वाचे आहेत, पण हे केवळ सीटी स्कॅनद्वारेच केले जाऊ शकतं.
एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डॉ. अभिषेक यादव म्हणाले की, वाफवलेले मोमो हे दिल्लीच्या आवडत्या स्ट्रीट फूडपैकी एक आहेत. मोमोजची पृष्ठभाग निसरडा आणि मऊ असतो. ज्यामुळे गुदमरल्यासारखे होऊ शकते आणि नीट चघळल्याशिवाय गिळल्यास ते प्राणघातक ठरू शकते.
नुकतेच झारखंड मधील लातेहारमधील ४ मुलींना पॅकेट बंद मिक्सचर आणि रिंग्स कुरकुरीत खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यामधील एका मुलीचा मृत्यू देखील झाल्याची घटना घडली .या घटनेनंतर सामुदायिक आरोग्य केंद्राच्या पथकाने गावातील दुकानात जाऊन विकल्या जाणाऱ्या मिक्सचर आणि रिंग्स कुरकुऱ्यांचा नमुना घेऊन चौकशीसाठी पाठवला.
सध्या विषबाधा होण्याच्या घटना सतत समोर येत आहेत. जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी वस्तूचे उत्पादन करणारे लोक किंवा विक्री करणारे विशिष्ट वस्तूंमध्ये भेसळ करत आहेत. अशा वस्तू विकून लोकांच्या जीवाशी खेळलं जात आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने याबाबत योग्य ती उपाययोजना करणं आवश्यक आहे.