इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात २०२२ च्या सीझनमध्ये टीव्ही रेटिंग सतत घसरण्याची ही कदाचित पहिलीच वेळ होती. यावर बीसीसीआयसह अनेक दिग्गजांनी चिंता व्यक्त केली. ख्रिस गेल (Chris Gayle) आणि एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) या मोसमात खेळले नाहीत हेही यातील सर्वात मोठे कारण मानले जात होते. (Chris Gayle, AB de Villiers, Indian Premier League)
पण आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पुढील आयपीएल हंगामात दिसू शकतो. पण तो खेळाडू म्हणून नव्हे तर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून उपस्थित असू शकतो. खुद्द डीव्हिलियर्सनेच याचे संकेत दिले आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एबी डिव्हिलियर्सला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, तो पुढील आयपीएल हंगामात प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे का? यावर आफ्रिकन स्टार म्हणाला, ‘खरं सांगायचं तर मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र पुढील आयपीएलमध्ये मी उपलब्ध होणार हे निश्चित आहे. मी ट्विटरवर ऐकले आहे की मी बंगलोर कॅम्पमध्ये सामील होऊ शकतो. त्यामुळे मला माझ्या दुसऱ्या घरी (बेंगळुरू) परतायला आणि चिन्नास्वामीच्या खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये सामना पाहायला आवडेल.
३८ वर्षीय एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल हे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले दोन क्रिकेटपटू ठरले आहेत. फ्रँचायझीने १७ मे रोजी या बातमीची पुष्टी केली. विशेष बाब म्हणजे हॉल ऑफ फेम लाँच करणारी RCB ही IPL ची पहिली फ्रँचायझी देखील आहे.
एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी एकूण १५६ सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर २ शतके आणि ३७ अर्धशतकांच्या मदतीने ४४९१ धावा आहेत. त्याच वेळी, ख्रिस गेल, ज्याला टी-२० क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक म्हटले जाते, त्याने आरसीबीसाठी ९१ सामने खेळले आणि ३४२० धावा केल्या, ज्यात ५ शतके आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे.
अलीकडेच ख्रिस गेलने एका मुलाखतीत सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये माझ्याशी चांगली वागणूक दिली गेली नाही, हे माझ्या लक्षात आले आहे. मग मला वाटले की या खेळात आणि आयपीएलमध्ये इतकं काम करूनही जर तुम्हाला योग्य तो सन्मान मिळाला नाही, तर मी मेगा लिलावात माझं नाव समाविष्ट करणार नाही. हेच त्यामागचे एकमेव कारण होते. क्रिकेटनंतरही जीवन आहे आणि मी त्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
आयपीएलमध्ये खेळण्याबाबत गेल म्हणाला, पुढच्या वर्षी मी पुनरागमन करेन. त्यांना माझी गरज आहे. आयपीएलमध्ये मी केकेआर, आरसीबी आणि पंजाब या तीन संघांसाठी क्रिकेट खेळलो आहे. आरसीबी आणि पंजाब यांच्यापैकी एका संघात राहून विजेतेपद पटकावायला मला आवडेल. मी आरसीबीमध्ये चांगली कामगिरी केली असून पंजाबही चांगला आहे.
महत्वाच्या बातम्या-
जबरदस्त! एबी डिव्हिलियर्सची होणार IPL मध्ये धमाकेदार एंट्री, पुन्हा दिसणार विराट कोहलीसोबत
नव्या डिव्हिलियर्सचा आयपीएलमध्ये दबदबा; लोक म्हणाले, हा कॉमेंटेटर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार
बेबी एबीमध्ये दिसली खऱ्या एबीची झलक, मारला सगळ्यात लांब षटकार, पहा जबरदस्त व्हिडीओ
खराब फॉर्मवर विराट कोहलीने सोडलं मौन, टीका करणाऱ्यांना एकाच वाक्यात दिलं सडेतोड उत्तर