पान आणि गुटखा खाण्याची संस्कृती भारतात खूप प्रचलित आहे. पान आणि गुटखा खाणाऱ्यांवर थुंकण्याच्या सवयीमुळे सर्वत्र घाण पसरते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाने अनेक प्रसंगी या समस्येचा सामना केला आहे. आता भारतात पान खाऊन थुंकणाऱ्याची आकडेवारी पुढे आली असून, यानुसार भारतातील लोक इतके थुंकतात की त्यातून 211 ऑलिम्पिक पूल भरले जाऊ शकतात.
पान खाऊन थुंकण्याची ही समस्या इतकी गंभीर आहे की, कोलकात्यातील हावडा पूल देखील यामुळे कोसळण्याचा धोका होता. मनोरंजक पद्धतीने डेटा सर्व्ह करण्यात माहिर असलेले ‘इंडिया इन पिक्सेल्स’ या सोशल मीडिया हँडलने पान थुंकण्याची ही भारतीयांची सवय मनोरंजक पद्धतीने मांडली आहे.
त्यानुसार दरवर्षी पान खाल्ल्यानंतर भारतातील लोक इतके थुंकतात की त्यातून 211 ऑलिम्पिक पूल भरले जाऊ शकतात, असे ते म्हणतात. इंडिया इन पिक्सेल्स’ ने भारतीय राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणातील ‘हाऊसहोल्ड कन्झमशन’ च्या डेटाचा आधार घेतला आहे. हे सरकारी आकडे 2011-12 चे आहेत. एका अहवालानुसार, थुंकणाऱ्या पानाचे सरासरी वजन 39.55 ग्रॅम आहे आणि त्याची घनता 1.1 ग्रॅम प्रति मिलीलीटर आहे.
त्याच वेळी, ऑलिम्पक स्विमिंग पुलाची क्षमता 2.5 दशलक्ष लिटर आहे. या आकडेवारीच्या आधारे, ‘इंडिया इन पिक्सल’ ने मोजले तेव्हा असे आढळून आले की, दरवर्षी भारतीय लोक तब्बल 211 स्विमिंग पूल हे पान खाल्लेल्या थुंकीने भरू शकतात.
पश्चिम बंगालमध्येही ही समस्या अत्यंत गंभीर आहे. हे राज्य 21.94 स्विमिंग पूल भरण्याच्या क्षमतेसह चौथ्या क्रमांकावर आहे. कोलकात्यात या समस्येमुळे सुमारे 10 वर्षांपूर्वी हावडा पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. पान आणि गुटख्याच्या थुंकण्यामुळे पुलाचा स्टीलचा तळ अर्धा तुटल्याचे बीबीसीच्या एका अहवालात म्हटले आहे.
हावडा ब्रिजची दुरुस्ती करणाऱ्या कोलकाता पोर्ट ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष एमएल मीना यांचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, लोकांनी थुंकून पुलाचा हँगर बेस केवळ तीन वर्षांत अर्ध्यावर आणला आहे. पुलाला वाचवण्यासाठी ट्रस्टला विशेष योजना करून पुलाचा पाया फायबर ग्लासने झाकणे आवश्यक बनले होते.
‘इंडिया इन पिक्सल’ने राज्यनिहाय आकडेवारीही दिली आहे. त्यानुसार पान खाल्ल्यानंतर थुंकण्यात उत्तर प्रदेशातील लोक आघाडीवर आहेत. एकट्या उत्तर प्रदेशातील लोक पान खाऊन थुंकीने दरवर्षी 46.37 स्विमिंग पुल भरू शकतात. यानंतर बिहारचा क्रमांक लागतो, जिथे लोक पान थुंकीने 31.33 स्विमिंग पूल भरू शकतात. तर ओडिशा 28.37 स्विमिंग पुलासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ ही तीन राज्ये मिळून दरवर्षी 105 ऑलिम्पिक स्विमिंग पूल भरू शकतात.