Share

लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही करताहेत; अजितदादांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

raj thackeray
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नव न घेता निशाणा साधला आहे. ‘सावधान रहा.. लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करत आहेत,’ असं देखील अजित पवारांनी म्हंटले आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असून त्यामुळे या चर्चेला अजूनच उधाण आलेलं आहे. याचाच धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

‘हेच भोंगावाले मागच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या बाजूने सभा घेत फिरत होते. काय झालं कुणास ठाऊक. त्यांनी आता उलटी पाटी लावली आहे. त्यांच्यामुळे राज्यातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येणार आहे. याची जाणीव सर्वांनी ठेवा’, असंही अजित पवारांनी राज यांचे नाव न घेता म्हंटले आहे.

याबाबत ते मोहोळ तालुक्यातील नगरच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना अजितदादा म्हणाले, ‘स्वतःचे १४ आमदार टिकवता आले नाहीत. नाशिककरांनी महापालिकेची सत्ता त्यांच्या हातात दिली. मात्र, तिथंही तेच… तुम्ही सावधान रहा.. आता हेच लोक स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी काहीही खटाटोप करताहेत.’

दरम्यान, मोहोळ परिसरासाठी जे जे करता येईल, ते ते करण्यासाठी मी माझे सर्वस्व पणाला लावीन, हा शब्द मी आपल्या सर्वांना देतो, असे अजित पवार म्हणाले. तसेच या मेळाव्याला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार बबनराव शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने इ. उपस्थित होते.

तर दुसरीकडे अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेला परवानगी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झालेला होता. पण आता पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी १६ अटी घातल्या आहे.

या अटींची अंमलबजावणी आणि जातीय तेढ निर्माण होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेआधी राज ठाकरे काल पुण्यात पोहोचले होते. राज ठाकरे आज पुणे येथून औरंगाबादला निघणार आहेत. महाराष्ट्र दिनी होणाऱ्या या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now