एकनाथ शिंदे यांच्यासहीत ३३ आमदार सुरतमधून विमानाने आसामच्या गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला आहे. तसेच अनेक मुद्दे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधान परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर शिंदे आणि त्यांचा समर्थक गट सूरतला रवाना झाला. सुरतमुक्कामी असलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे नेमके किती आमदार आहेत, याबाबत मंगळवारी सकाळपासून विविध आकडे सांगितले जात होते.
प्रत्येकजण आपापली आकडेवारी सांगत आहेत. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत एकूण किती आमदार आहेत, याबाबत खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्यासोबत ४० शिवसेनेचे आमदार आहेत. आणखी १० आमदार येणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे.
तसेच म्हणाले, आम्ही शिवसेना सोडलेली नाही, शिवसेना सोडणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत. मला कोणावर टीका करायची नाही. इथे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आम्हाला बाळासाहेबांचे हिंदुत्व पुढे घेऊन जायचे आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबतच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो समोर आला असून या फोटोमध्ये ३३ आमदार दिसत असून यापैकी ३१ आमदार हे फक्त शिवसेनेचे आहेत. यासोबतच आमदार बच्चू कडूदेखील या फोटोमध्ये दिसून आल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये प्रदीप जयस्वाल, संदिपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, यशवंत जाधव, प्रहारचे आमदार बच्चू कडू, राजकुमार पटेल दिसत आहेत. यशवंत जाधव गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत.