न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. काल अकोला येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने कलम 156 (3) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून कडू यांनी अद्याप यावर भाष्य केलेलं नाहीये.
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अपक्ष आमदार राज्यमंत्री बच्चू कडू हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांसाठी ते नेहमी तत्पर असतात, अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारविरोधात देखील भाष्य केले आहे. तसेच त्यांचा आक्रमकपणा, रोखठोक विधान अनेकदा चर्चेचे विषय बनले आहे.
मात्र आता कडू अडचणीत सापडले आहेत. वाचा नेमकं प्रकरण काय? अकोला जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आलेल्या रस्त्याच्या प्रस्तावात बदल करून मंत्री बच्चू कडू यांनी १ कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.
याबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर (Dhairyavardhan Pundkar) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. यानंतर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी कारवाईसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.
याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी न्यायालयात पुरावे सादर केले होते. दरम्यान, मंगळवारी याप्रकरणी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी देखील योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते.