महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पक्षाचे कार्यकर्ते नेहमीच त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. नुकेतच मनसे कार्यकर्ते चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, त्यांनी संस्थेत कामाला लावण्यासाठी महिलेकडून शरीर सुखाची मागणी केलेल्या नराधमाला दिलेला चोप. सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नेरुळ येथील एका संस्थेत कामाला लावण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला चांगलाच चोप दिलाय. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
नोकरीच्या बदल्यात वरिष्ठ अधिकाऱ्याने या असाह्य महिलेकडे शरीरसुख देण्याची मागणी केली होती. या अधिकाऱ्याचे नाव प्रेम चव्हाण असं आहे. तो बीआरसीमध्ये हाऊस किपिंगचे काम करतो. पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत शरीरसुखाची मागणी त्याने केली.
महिलेने या नराधमाविरोधात मनसेच्या बाळासाहेब शिंदे यांच्याकडे तक्रार केली. या नराधमाने मला वारंवार फोन करून दबाव टाकून नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली असल्याचं महिलेनं मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितले. कार्यकर्त्यांनी नराधमाला रंगेहात पकडण्यासाठी प्लॅन केला.
https://twitter.com/News18lokmat/status/1496196546890973185?t=_6ZGlugo6tg5rw5HJkiXnw&s=19
आरोपी अधिकाऱ्याने एक दिवस महिलेला फोन करून, वाशी येथील लॉज वरती येण्यास सांगितलं. महिलेनं याबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली. यावेळी हा नराधम अधिकारी लॉजमध्ये आला असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या नराधमाला रंगेहात पकडलं. त्याला लॉजच्या बाहेर आणलं आणि चांगला चोप दिला.
शेवटी अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी केल्याचं कबूल केलं. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी या नराधमाला नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. सध्या मनसे कार्यकर्त्यांनी आरोपी अधिकाऱ्याला चोप देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.