कोरोना व्हायरसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यांपासून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. कोरोना आकडेवारी लक्षात घेता देशातील निर्बंध देखील उठवण्यात आले आहेत. मात्र, आता एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
सध्या काही युरोपियन आणि पुर्व आशियाई देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी निर्देश दिले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना उच्च पातळीची दक्षता आणि निगराणी ठेवण्यासाठी आणि आक्रमकपणे जीनोम सिक्वेन्सिंगचा पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलवण्यात आली होती.
तसेच, 27 मार्चपासून नियोजित आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, लसीकरणस्थिती आणि जीनोमिक पाळत ठेवण्याच्या पातळीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या चीन, हॉंगकाँग, सिंगापूर, व्हिएतनाम आणि काही युरोपियन देशांमधील वाढत्या केसेस पाहता ही बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत आरोग्य सचिव राजेश भूषण,जैवतंत्रज्ञान सचिव डॉक्टर राजेश गोखले,औषधनिर्माण विभागाचे सचिव एस अपर्णा, नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल, आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव,एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया तसेच NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा सहभागी होते.
सध्या चीन मध्ये कोरोना संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीन मध्ये शेनझेन येथील 1.75 कोटी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. चीनमधील अनेक भागात लॉकडाऊन देखील पडलेला आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट आली असल्याचं म्हंटले जात आहे.
इतर देशात वाढत्या कोरोनाच्या आकडेवारीला लक्षात घेता आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन आवश्यक ते आदेश दिले आहेत. आता कुठे भारत कोरोना संकटातून बाहेर पडत आहे, तोवरच समोर असणारा संभाव्य धोका पाहून केंद्राने आवश्यक ती काळजी घेऊन निर्देश दिले ही चांगली बाब आहे.






