कोरोनाच्या महामारीत अनेकांचा मृत्यू झाला. अनेक संसार उध्वस्त झाले. कुटुंबातील मुख्य माणूस गेल्याने अनेक महिला विधवा झाल्या ,आणि कुटुंबावर शोककळा पसरली. मात्र, एका ठिकाणी कोरोनात आपला भाव गेल्यामुळे विधवा वहीनीला आयुष्यभराची साथ देऊन तिच्यासोबत दिराने लग्न केल्याची घटना घडली आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ढोकरी येथे ही कौतुकास्पद घटना घडली आहे. कोरोनाच्या काळात आपल्या सख्या मोठ्या भावाचे निधन झाले, त्यामुळे वहीनी विधवा झाली. 3 वर्षांच्या चिमुकलीला पदरात सोडून नवरा कायमचा गेल्याने वहीनीचे दुःख दिराला बघवेना झाले.
त्यामुळे घरातील इतर सदस्यांसोबत चर्चा करून, त्याने आपल्या मोठ्या भावाच्या बायको सोबत म्हणजेच त्याच्या मोठ्या वहीनीसोबत लग्न करायचे ठरवले. त्याच्या या निर्णयामुळे समाजापुढे आदर्श उभा केला. अनेकांनी त्याच्या या निर्णयात साथ दिली आणि त्याचे त्याच्या वहीनीसोबत लग्न लावून दिले.
कोरोनात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव निलेश शेटे असे आहे. त्याचे मागील वर्षी कोरोनाच्या लाटेत निधन झाले. पत्नी पूनम अवघ्या 24 वर्षांची असताना तिचा पती कोरोनात गेला. दोघांना 3 वर्षांची मुलगी देखील आहे. भरल्या संसारातून घरातील मुख्य व्यक्ती गेल्याने कुटुंबावर तसेच त्या महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला.
पुनमसमोर जीवनाचा सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला. दिर असणाऱ्या समाधान ला आपल्या वहीनीचे हे दुःख जाणवत होते. त्यामुळे त्याने आपल्या वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. गावातील जेष्ठ व्यक्ती माधव तिटमे यांनी पुढाकार घेतला आणि लहान दिराचा वहीनीसोबत विवाह लावून दिला.
या निर्णयाचे गावातील अनेकांनी कौतुक केले. यामुळे विधवा पुनमच्या आयुष्यात देखील गेलेले सुख परतले. लग्न झाल्याने पुनमचा आनंद गगनात मावेना. कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती विधवा महिलांसाठी गेली अनेक महिने काम करत आहे. त्यामुळे या दीर भाऊजय यांचा कोरोना एकल पुनर्वसन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा घरी जाऊन सत्कार देखील केला.