सध्या उन्हाळा सुरू आहे, उष्णतेची लाट दिवसेंदिवस वाढत जात आहे. अशातच स्वतः चे उकाड्यापासून संरक्षण व्हावे यासाठी लोक फॅन, कुलरचा वापर करत आहेत. मात्र, हाच कुलर आता त्यांचा जीव घेत असल्याचं समोर येत आहे. अशा अनेक घटना आपल्या कानावर येत आहेत, ज्यामध्ये कुलरमुळे लोकांचे प्राण गेले आहेत.
अशीच एक आणखी धक्कादायक बातमी आपल्या समोर येत आहे. कुलरमुळे आजोबा आणि नात- नातू यांचा जीव गेला आहे. संबंधित घटना ही नाशिकच्या बागलाण महडमधून समोर येत आहे. येथील एक कुटुंब दिनचर्या आटोपून रात्रीचे जेवण करून झोपण्यासाठी गेले. त्यात आई, आजोबा, नातू अन्य एकजण पत्र्याच्या खोलीत कुलरच्या हवेत झोपले.
तर कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर मोकळ्या हवेत झोपले होते. मात्र सकाळी खोलीत झोपलेल्या चौघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारारसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची स्थिती गंभीर झाली. नेहा अनिल सोनवणे नामक मुलगी, तिचा भाऊ, आणि आजोबा यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
या घटनेतील मुलीच्या आईची देखील स्थिती बिकट असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या कुटुंबाला नेमकी कशाची बाधा झाली हे अद्याप समजू शकले नाही. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.
प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलरजवळ ठेवलेल्या शेतपिकांवरील विषारी औषधांचे द्रव्य कुलरच्या हवेने पत्र्याच्या खोलीमध्ये झोपलेल्या सदस्यांच्या नाकातोंडात गेले. या विषारी द्रव्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला, आणि त्यांची स्थिती बिघडली.
मात्र, वैद्यकीय सूत्रांनी दिलेली माहिती कुटूंबातील इतर सदस्यांना पटत नाही. त्यांनी हा अंदाज खोडून काढला आहे. सध्या मुलीची आई सरिता सोनवणे हिच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र दिवसेंदिवस कुलरमुळे होत जाणाऱ्या घटनेमुळे लोकांपुढे प्रश्न उपस्थित होत आहेत.