Share

काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान; म्हणाले, दारू ही आमची संस्कृती आहे, घरात 12 बाटल्या ठेवायला हव्यातच

राजस्थानमधील काँग्रेस आमदारांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीत. संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल यांच्यानंतर आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार गणेश घोघरा यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी दारूच्या मुद्यावर केलेल्या मागणीमुळे ते चर्चेत आले आहेत.

आमदार गणेश घोघरा यांचे दारूबाबतचे वक्तव्य चर्चेत आले आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी राजस्थानमध्ये दारूबंदीचा विचार मांडला होता, पण त्यांच्याच पक्षाचे आमदार आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश घोघरा यांनी दारूला आदिवासी समाजाच्या संस्कृतीशी जोडले.

काँग्रेसचे आमदार गणेश घोघरा म्हणाले की, आदिवासीयांमध्ये दारूला प्राधान्य दिले जाते. कोणताही उत्सव असो, कार्यक्रम असो, यामध्ये दारू लागतेच. दारूने आम्ही आमच्या पूर्वजांची पूजा करतो आणि आशीर्वाद घेतो. दारू आमच्या संस्कृतीचा भाग आहे असे त्यांनी सांगितले.

गुरूवारी सभागृहात उत्पादन शुल्क विभागाच्या अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान घोघरा यांनी आदिवासी भागात राहणाऱ्या कुटुंबांना 12 देशी दारू महुआच्या बाटल्या ठेवता येण्यासाठी आणि ठेवल्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, या भागात एक आणि दोन बाटल्या असताना उत्पादन शुल्क अधिकारी 10 ते 12 सांगूनच कारवाई करतात आणि खटला भरतात.

मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की, दारू बाळगणे आणि त्याचा विविध कार्यक्रमात वापर करणे हा आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि चालीरीतींमध्येच समाविष्ट आहे. याला विरोध होऊ नाही. असे गणेश घोघरा यावेळी बोलले. त्यांनी या ठिकाणी चालू होणाऱ्या इंग्रजी दारूच्या दुकानांबद्दल देखील वक्तव्य केले आहे.

म्हणाले, आदिवासी भागातही इंग्रजी दारूची दुकाने सुरू होत आहेत. 1 ते 2 हजार रुपयांची इंग्रजी दारूची बाटली विकत घेऊन गरीब आदिवासी आणखी गरीब होणार आहेत. देशी दारू बंद करण्याचा हा डाव आहे का? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. म्हणाले की, आदिवासी भागात इंग्रजी दारूचे ठेके बाहेरील लोकांना दिले जातात. या दुकानांच्या वाटपात टीएसपीचे आरक्षण असले पाहिजे, यावर त्यांनी सर्वांचे लक्ष केंद्रित केले.

दरम्यान, अनुदानाच्या मागण्यांवर सभागृहात चर्चा करण्यासाठी प्रत्येक आमदाराला 7 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता, मात्र सभापतींनी घोघरा यांना हे प्रकरण लवकर आटपून बसण्यास सांगितल्याने घोघरा संतापले. आम्हाला बोलू दिलं जात नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच म्हणाले, आदिवासींच्या हक्कांवर गदा येत आहे. मला बोलू द्या ,मी निवडून आलो आहे. आता कुठे बोलायला शिकत आहे, त्यामुळे सभागृहात बोलण्याची संधी मला मिळाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यावर सभापती जेपी चंदेलिया यांनी घोगरा यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी त्यांनी आदिवासीयांच्या अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले.

राजकारण

Join WhatsApp

Join Now