ऋतुजा लटके यांनी मुंबई महापालिकेतील लिपीक पदाचा दिलेला राजीनामा मंजूर न झाल्यामुळे त्यांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार की नाही, याबाबत अंदाज बांधणं कठीण जात आहे. त्यामुळे आता आगामी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धाकधूक उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला लागून आहे.
मात्र, आता अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंना काँग्रेसकडून मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड काँग्रेस या विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊन करणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
यापूर्वी महाविकास आघाडी म्हणून लढताना दोन पोटनिवडणुकांमध्ये शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती. परिणामी काँग्रेसचे उमेदवार निवडूनही आले होते. ठाकरेंनी केलेल्या दोन उपकारांची परतफेड करण्याची संधी आता काँग्रेसकडे असल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे काँग्रेसवर असणारे दोन उपकार म्हणजे, २०२१ मध्ये काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यामुळे नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. काँग्रेसने त्यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना तिकीट होतं.
त्यावेळी, विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे जितेश अंतापूरकर हे ४१ हजार ९३३ मतांनी विजयी झाले होते, आणि भाजपच्या सुभाष साबणेंचा काँग्रेस पराभव करू शकली.
त्यानंतर, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर दोन एप्रिल २०२२ रोजी पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवार घोषित केले. त्यांना देखील शिवसेनेने पाठिंबा दिला होता. तिथेही जयश्री जाधव यांचा विजय झाला होता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हे दोन उपकार काँग्रेसवर असल्यामुळे आता अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला गरज असताना काँग्रेस पाठिंबा देणार अशी चर्चा आहे.