BJP Congress Alliance Ambernath : भाजप-काँग्रेस युतीचा पहिला बळी; प्रदेशाध्यक्षांची तातडीने कडक कारवाई सुरू

BJP Congress Alliance Ambernath : अंबरनाथ (Ambernath City Thane) नगरपालिकेत सत्तेसाठी झालेल्या भाजप (Bharatiya Janata Party)-काँग्रेस हातमिळवणीमुळे काँग्रेसच्या स्थानिक पातळीवर खळबळ उडाली आहे. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या शिंदेसेनेला (Shiv Sena ) सत्तेबाहेर ठेवण्यासाठी करण्यात आलेली ही युती पक्षशिस्तीच्या विरोधात ठरल्याने काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने कठोर भूमिका घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या अनैसर्गिक समीकरणावर उघड नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी थेट कारवाईचा बडगा उगारला. अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील (Pradeep Patil) यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली असून, पक्षाची ब्लॉक कार्यकारिणीही बरखास्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रदेश कार्यालयाची परवानगी न घेता भाजप सदस्यांसोबत गटबंधन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.

पत्रात नमूद करण्यात आले आहे की, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आलेल्या सदस्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेला धक्का देणारी कृती केली. अशी कृती ही थेट पक्षशिस्तीचा भंग करणारी असून, यापुढेही अशा प्रकारे सहभागी असलेल्या सर्व नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

अंबरनाथ नगरपालिकेतील सत्ताकारणासाठी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत शिंदेसेनेला दूर ठेवले. या गणितामुळे राज्यभरात चर्चा रंगली. एकीकडे देशपातळीवर ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा आणि दुसरीकडे स्थानिक सत्तेसाठी काँग्रेसशी थेट युती या विरोधाभासावर टीका झाली. त्यातच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला होता.

भाजपकडून औपचारिक कारवाई होण्याआधीच काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाने कडक पाऊल उचलत निलंबनाचे आदेश काढल्याने, ही ‘पहिली विकेट’ ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुढील काळात या युतीशी संबंधित आणखी कारवाया होतात का, याकडे लक्ष लागले आहे.