शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी विशेषतः शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेसने एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने व्हायरल केलेल्या या व्हिडीओला ‘असा हा भाजपचा पाहुणचार; बंडखोरांची हरपली शुद्ध पार’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी देखील एकनाथ शिंदे यांचा ‘कडक’ शब्दात समाचार घेतला आहे.
एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निकाल लागल्यानंतर शिवसेनेत बंड करून प्रथम सूरत गाठली. त्या ठिकाणी एक दिवस मुक्काम केल्यानंतर शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आसामधील गुवाहाटीमध्ये जाणे पसंत केले. सूरतहून गुवाहाटीमध्ये गेल्यानंतरचा काँग्रेसने व्हायरल केलेला एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे.
या व्हिडिओमध्ये शिंदे हे मोठ्या गर्दीत अडकल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर पत्रकारांकडून विविध प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. मात्र, शिंदे यांना या गर्दीत नीट बोलता येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तोच व्हिडिओ सध्या महाराष्ट्र काँग्रेसने व्हायरल केला आहे.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड फिरत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका नेटकऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे, ‘वाघ डुलतोय आणि मी पाहिलंय’ असं त्याने लिहिलं आहे. तर दुसऱ्याने, ‘अरेरे…. काय अवस्था झाली आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1540656171245309952?t=vEYFFD3-YDCLYgrv-dvaJg&s=19
एका दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की,‘कब तक रहोंगे गुवाहटीमें; कबी तो आवोगे चौपाटीमें’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी शिंदेंच्या समर्थनार्थ देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिंदेंच्या एका समर्थकाने लिहिले, ‘ह्यात असं काहीही दिसतं नाही..उगाच कुणाची बदनामी करु नये,’ असे लिहिले आहे.