Nana Patole On BJP : तेलंगणातील (Telangana) गोशामहाल (Goshamahal) मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) आक्रमक आमदार टी. राजा सिंह उर्फ टायगर राजा यांनी पक्षाला अचानक रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाकडे पाठवून तसेच सोशल मीडियावर शेअर करत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे.
राजा सिंह हे सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे नेते आहेत. सलग तीन वेळा गोशामहालचे प्रतिनिधित्व करत त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलं.
प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याने नाराज
टी. राजा सिंह (T. Raja Singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओद्वारे पक्ष नेतृत्वाला थेट संदेश दिला होता. “माझ्या कार्यकर्त्यांना वाटतं की मी प्रदेशाध्यक्ष होऊ. अनेक कार्यकर्त्यांनी मला फोन करून तीच मागणी मांडली आहे. पक्षाने मला ही संधी द्यावी,” असं त्यांनी म्हटलं होतं.
या मागणीनंतर त्यांनी स्पष्ट कार्यक्रम जाहीर करत सांगितलं की, “गोरक्षा आघाडी तयार करून गोरक्षक कार्यकर्त्यांसाठी मी ढाल बनून उभा राहीन. हिंदुत्वाचा प्रचार करीत भाजपला (BJP) घरोघरी पोहोचवेन,” असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन होता.
पक्षाकडून रामचंदर राव यांची निवड निश्चित?
दरम्यान, एन. रामचंदर राव (N. Ramchander Rao) यांच्याकडे तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्या नावाला मंजुरी दिल्याचे सूत्रांकडून समजते.
रामचंदर राव (Ramchander Rao) हे एक अनुभवी वकील असून, विधान परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपच्या कायदेशास्त्र आघाडीत सक्रिय राहिले आहेत.
इतर दावेदार बाजूला, रामचंदर राव यांच्याकडे झुकले पारडे
प्रदेशाध्यक्षपदासाठी केंद्रीय राज्यमंत्री बंडी संजय (Bandi Sanjay), खासदार ईटाला राजेंद्र (Etela Rajender) आणि अरविंद धर्मपुरी (Arvind Dharmapuri) यांची नावं चर्चेत होती. मात्र पक्षाने शांत स्वभाव आणि संघटन कौशल्य असलेल्या रामचंदर राव यांना पसंती दिल्याचं मानलं जात आहे.
टी. राजा सिंह यांचा पक्षत्याग, भाजपसाठी (BJP) तेलंगणात एक मोठा धक्का ठरू शकतो. त्यांचा समर्थक वर्ग आणि आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका पक्षासाठी महत्त्वाची होती. त्यामुळे त्यांची राजकीय दिशा आता कुठे वळते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे






