नुकत्याच पार पडलेल्या केज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण, जास्त जागा मिळवत यश मिळवणारी जनविकास परिवर्तन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
केज नगरपंचायत निवडणुकीत जनविकास परिवर्तन आघाडीला घवघवीत यश मिळाले. जनविकास परिवर्तन आघाडीला 8, काँग्रेसला 3, तर,राष्ट्रवादी काँग्रेसला 5 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा मिळाली होती. कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे सत्तास्थापनेचा चर्चेला उधाण आले होते आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
केज नगरपंचायतमध्ये जनविकास परिवर्तन आघाडी व काँग्रेस एकत्र येणार असून सत्ता स्थापन करणार असल्याची घोषणा बुधवारी पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. यावेळी, जनविकास परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष हारून इनामदार, ज्येष्ठ नेते अंकुशराव इंगळे, काँग्रेसचे युवा नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील, नगरसेवक पती पशुपतीनाथ दांगट आदींची उपस्थिती होती.
यावेळी, काँग्रेसचे युवा नेते तथा माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील म्हणाले, शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. विकासाचा अनुशेष भरून काढला जाईल. तसेच राष्ट्रीय काँग्रेसचा जनविकास परिवर्तन आघाडीला पाठिंबा आहे. जनविकास परिवर्तन आघाडीचा 5 वर्ष नगराध्यक्ष तर काँग्रेसचा उपनगराध्यक्ष राहील अशी घोषणा यावेळी त्यांनी केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना,जनविकास परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष हारून इनामदार म्हणाले, खासदार रजनी पाटील यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी आणि पाटील हे आमच्याच गावचे या विचारातून आम्ही एकत्र आलो आलो आहोत. शहराच्या विकासासाठी आम्ही सक्षम नगराध्यक्ष देणार आहोत.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र,राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. खासदार राजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी एकत्र आली आहे.