राज्यसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेशी दगाबाजी केली, यावरून वाद सुरू असताना आता काँग्रेसच्या आमदारांनी देखील शिवसेनेशी दगाबाजी केली अशी माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या काही आमदारांनी शिवसेनेला सोडून भाजपला मतदान केल्याचा दावा केला जात आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती ठरली होती. त्यानुसार, काँग्रेसचा ४२ मतांचा कोटा ठरलेला असतानाही कॉंग्रेसने २ अतिरिक्त मतं पहिल्या पसंतीची काँग्रेसच्या उमेदवाराला दिली.
ही दोन अतिरिक्त मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना देण्याची हमी काँग्रेसने दिली होती, पण जी रणनीती महाविकास आघाडीची ठरली होती त्याप्रमाणे प्रत्यक्षात झालेच नाही हे निकालानंतर सगळ्यांच्या समोर आले आणि शिवसेनेचा पराभव झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसची सर्व पसंतीची मतं शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनाच देण्याचं ठरलं असतानाही काँग्रेसने दुसऱ्या पसंतीची मोठ्या प्रमाणात मतं भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांना दिली. त्यामुळे काँग्रेसची दगाबाजी सर्वांच्या समोर आली.
आता काँग्रेसने शिवसेनेसोबत दगाबाजी केली ही माहिती उघड झाल्याने शिवसेना संतप्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने शिवसेनेला मत न देऊन भाजपला दिले यामागे आमदारांना केंद्रीय यंत्रणांची भीती असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे आता राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाल्याचं समोर येत आहे. शिवसेनेसोबत झालेली दगाबाजी यामुळे आता पुढे शिवसेना कोणत्या पक्षावर विश्वास ठेवेल की नाही याबद्दल चर्चा होत आहे. तसेच येणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना बदला घेणार का याबद्दल देखील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.