भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर एका पत्रकार परिषदेत काळी शाई फेकली गेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे.
पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी दोन संघटना एकमेकांवर भिडल्याने गोंधळ उडाला होता. राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी संबंधीत व्यक्तीला पकडले. दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने गोंधळ उडाला होता. माहितीनुसार, स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थंकाने टिकैत यांच्यावर शाई फेकली, असा आरोप टिकैत यांच्या समर्थकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या दोन संघटनेतील कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
घडलेली घटना म्हणजे, पत्रकार परिषदेदरम्यान टिकैत यांना पत्रकारांनी शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे उपस्थित लोकांनी विचारले असता. त्यावर प्रतिक्रिया देताना टिकैत म्हणाले की, आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. हे ऐकताच चंद्रशेखर यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली.
https://twitter.com/ramanmann1974/status/1531194715894599680?t=3prP4FOvuImvoe4r6dX9tA&s=19
हल्ला झाल्यानंतर टिकैत यांनी माध्यमांशी संवाद साधला. टिकैत म्हणाले, स्थानिक पोलिसांनी कुठलीही सुरक्षा पुरवली नाही. यावरुन टिकैत यांनी सरकारवर टिका केली. भाजप सरकारच्या सांगण्यावरुन माझ्यावर हा हल्ला करण्यात आला, असाही आरोप टिकैत यांनी केला आहे.
याआधी देखील वर्षभरापूर्वी राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर राजस्थान येथे हल्ला झाल्याची घटना घडली होती. राजस्थानमध्ये काही लोकांच्या गटाने हा हल्ला केला होता. टिकैत अलवरमधील हरसौरामध्ये एका सभेला संबोधित केल्यानंतर बानसूरला जात होते. यावेळी ततारपूरमध्ये घोळक्याने टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली होती. या हल्ल्यामध्ये राकेश टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. या दरम्यान काही लोकांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली होती.