सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केलं आहे. शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास मातीमोल झाला आहे. शेतकऱ्यांची अशी बिकट स्थिती पाहून आता राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान पाहून विरोधक अनेक दिवसांपासून राज्य सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष नाही असा टोला विरोधक लगावत आहेत.
अशातच शेतकऱ्यांना सरकारी मदत कधी केली जाणार याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात होते. त्याचं उत्तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदें यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे.
भूविकास बॅंकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. तसेच ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. या घोषणेमुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सात लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार आहे. तर ९६४ कोटी १५ लाख रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे अशी माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.
शिवाय, परतीच्या पावसाने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तातडीने हे सगळे पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसेच शेतकऱ्यांनी खचू नये. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं आहे. मदतीसाठी सरकार तयार आहे, असेही शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी शेवटी ३० जून २०२२ पर्यंतचे राजकीय, सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यात येत असल्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या या घोषणांमुळे सध्या शेतकऱ्यांना, आणि आंदोलकांना थोडा तरी दिलासा मिळाला आहे असेच म्हणावे लागेल.