Share

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्हायरल होणाऱ्या ‘या’ पत्रावर दिलं उत्तर ; म्हणाले,’99 टक्के संपत्ती ही…’

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे माजी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आता चांगलेच अडचणीत सापडले असल्याची चिन्हे दिसत आहेत. सोशल मीडियावर सध्या एक पत्र व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. या पत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ते चांगलेच गोत्यात अडकले असल्याचं बोलले जात आहे.

त्यानंतर समाज माध्यमांवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नेमकी किती संपत्ती यावर अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. आता त्यांच्या संपत्तीबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. माहितीनुसार, कृष्णप्रकाश यांनी राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता घेतली आहे.

त्यांची मुंबई, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, देहूगाव, बाणेर, कुपवाड या ठिकाणी जमीन आणि प्लाॅट्स आहेत. तसेच, झारखंड, हजारीबाग येथे देखील त्यांच्या जमीनी, फ्लॅट्स आहेत, अशी माहिती समोर आली आहे, त्यामुळे पोलीस दलात खळबळ निर्माण झाली.

मात्र, या व्हायरल होणाऱ्या गोष्टींबाबत आता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः खुलासा केला आहे. 99 टक्के संपत्ती वडिलोपार्जित असून केवळ 1 टक्का महाराष्ट्रातील मालमत्ता ही गेल्या 24 वर्षाच्या सेवाकाळात घेतल्याचे कृष्णप्रकाश यांनी यावेळी सांगितले. तसेच, ती संपत्ती छुपी नसून राज्य सरकारकडे जाहीर केली असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कृष्ण प्रकाश यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी गंभीर आरोप केले होते. त्यांनी याबाबत नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना पत्र दिले होते. चांगल्या वित्तीय संस्थांची दिवाणी तक्रार असताना अनेक गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही आरोप केला होता. आयुक्तांचा खरा चेहरा समाजापुढे उघड झाला पाहिजे, अशी मागणीही केली होती.

इतर

Join WhatsApp

Join Now