एका तरुणानं जनशताब्दी एक्सप्रेसशी वॅगनआर गाडीने स्पर्धा लावली आहे. तब्बल एक तास जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकत वॅगनआरने निश्चित ठिकाण गाठलं आहे. राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सध्या कशी आहे सर्वांनाच माहिती आहे, अशा परिस्थितीत वॅगनआर गाडीने रेल्वेला एक तास मागे टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ही स्पर्धा लावणाऱ्या वॅगनआर चालकाचे नाव तेजस हंजणकर आहे. मुंबई ते गोवा आणि गोवा ते मुंबई हा परतीचा प्रवास 1200 किलोमीटर अंतराचा आहे. अशा परिस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर जलद धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसशी दिवा गावातील या तरुणानं त्याच्या वॅगनआर गाडीनं स्पर्धा लावली.
तेजस हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा येथील रहिवासी आहे. सध्या तो दिवा गावात राहतो. त्याने जनशताब्दी एक्स्प्रेसला मागे टाकण्याचा निश्चय केला होता. त्यात त्याला यश आलं, आणि जुन्या मुंबई – गोवा- मुंबई महामार्गाने तो मडगाव येथे जनशताब्दी एक्सप्रेसच्या आधी पोहोचला.
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही जनशताब्दी एक्सप्रेस सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी सुटते आणि मडगाव-गोवा येथे 2 वाजून 20 मिनिटांनी पोहोचते. परत मुंबईच्या परतीच्या प्रवासाला 2 वाजून 40 मिनिटांनी निघते आणि रात्री 11 वाजून 20 मिनिटांत मुंबई सीएसएमटी पोहोचते.
मात्र, तेजस त्याच्या वॅगनआर गाडीने मुंबई येथून सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी निघाला आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या 1 तास 20 मिनिटे आधीच तिथे पोहोचला. त्याने जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकण्याचे आव्हान पार पाडले. त्यामुळे आता त्याने त्याच्या नावावर नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.
तेजसने 16 तास 31 मिनिटे गाडी चालवून हा विक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळे आता या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक आणि इंडिया बुक रेकॉर्ड बुक मध्ये होणार असल्याचं बोललं जात आहे. या संपूर्ण प्रवासात त्याने फक्त 34 मिनिटं थांबा घेतला. तेजस चालवत असलेल्या गाडीचा सर्वात टॉप स्पीड 157 प्रती तास किमी होता.