मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तर सभेमध्ये चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी केलेल्या टीकांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील खोचक शब्दात टोलेबाजी केली.
राज ठाकरे यांनी या उत्तर सभेत भोंग्यांच्या मुदयांसोबतच प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, यांच्यासोबतच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, मशिदीच्या भोग्यांचा देशभर त्रास आहे. आज माझं भाषण ऐकणाऱ्या हिंदूंना माझं सांगण आहे. 3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर देशामध्ये जिथे जिथे मशिदीवर भोंगे सुरू असतील तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. देशभर लागले पाहिजे… आम्हाला जो त्रास होतो तो त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.
याच मुद्यांवरून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. म्हणाले, इकडचे ते आव्हाड.. नागाने फणा काढावा असा चेहरा आहे. आता उद्या काय तरी बोलतीलचं डसू शकतो.. बिसू शकतो.. ये शेपूट धरतो.. गरगर फिरवतो आणि फेकून देतो. अशा शब्दात राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांवर उपरोधिक टीका केली आहे.
यावेळी राज ठाकरेंनी मुंब्र्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची यादी वाचत असताना जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. ‘म्हणे राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला’ असा एकेरी उल्लेख करत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
26 जानेवारी 2019 मध्ये मुंब्रा येथील तलाह उर्फ अबूक बकार, हनीफ कोत्रीक याला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. हे सगळे मुंब्र्यातील आहे. जेथून आव्हाड निवडून येतात. पुढे म्हणाले, आता तुम्ही म्हणाल वस्तरा नाही सापडला…आता कसा संन्यास घेणार… मी कुठे बोललो अतिरेकी सापडत नाही. या अशा अनेक असंख्य घटना देशातील मदरश्यांमध्ये चालल्या आहेत.
यामध्ये पाकिस्तानमधील अनेक हस्तक आहेत. याच्यामध्ये अतिरेकी आहेत, शस्त्र सापडत आहेत. यामध्ये देशामधील प्रामाणिक, जो खरचं या देशावर प्रेम करणारा मुसलमान तो यामध्ये भरडला जातोय, असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे. राज यांनी केलेल्या टिकेवर जितेंद्र आव्हाड काय प्रतिउत्तर देतात हे पाहावं लागेल.