महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा सहयाद्री मराठी वाहिनीकडे वळवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी लढणाऱ्या तसेच मराठी तरुणाई व मराठी कलाकारांसाठी नेहमी आग्रही भूमिका घेणाऱ्या मनसेने आता परत एकदा मराठी बाणा दाखवला आहे. राज ठाकरेंनी दूरदर्शन पश्चिमचे अप्पर महासंचालक नितीन अग्रवाल यांना पत्र पाठवून मराठी भाषेतील कार्यक्रमच प्रसारित व्हावेत अशी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले की, दूरदर्शनने (आताचे प्रसार भारती) १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली. त्याचा उद्देश हा महाराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हावे हा आहे.
परंतू, सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचे प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्व सामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. तसेच याबाबत माहिती अधिकारातूनही ही बाब उघड झाली आहे. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.
तसेच पुढे लिहितात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सह्याद्री तसेच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून दाखवला जातो, त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत.
पण ‘कोशिश से कामयाबी तक’, ‘तराने पुराने’ हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुनः प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जाते.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/wpoRLhXuIs
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2022
हे निश्चितच मूळ उद्देशाला धरून नाही. आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्र राज्यात आहेत.
त्यामुळं मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचं भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा.
सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा. हीच एकमेव अपेक्षा. आमच्या मागणीचा आपण जरूर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल. असे पत्रात नमूद करण्यात आलं आहे.