मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली होती. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. यावर आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केतकी चितळेवर अश्लील भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल केला आहे.
केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. तिला पोलिसांनी अटक केली. आज न्यायालयाने तिला पोलिस कोठडी देखील सुनावली आहे. यावर आता चित्रा वाघ यांनी ट्विट करत केतकी चितळेवर अश्लील भाषेत टीका करणाऱ्यांबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे, त्यात लिहिले आहे की ‘केतकी चितळे वर कारवाई झाली, आता त्याच बरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी. कायदा सर्वांना समान असतो, असं म्हणतात.’
त्यांनी सोबतच केतकीला आलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा स्क्रिन शॉट देखील जोडला आहे. यामध्ये अनेकांनी केतकीला शिवीगाळ करत अश्लील भाषेत दिलेल्या प्रतिक्रिया आहेत. चित्रा वाघ यांनी प्रश्न केला आहे की, मग यांच्यावर कारवाई करणार का? चित्रा वाघ यांच्या प्रश्नाचे अनेकांनी समर्थन केले आहे.
https://twitter.com/ChitraKWagh/status/1525734256353300480?t=ejuJUXdANMg6RHO4inltGQ&s=19
केतकी चितळेने पोस्ट केली होती, त्यामध्ये लिहिले होते की,तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक सगळे पडले उरले सुळे, सतरा वेळा लाळ गळे,समर्थांचे काढतो माप, ते तर तुझ्या बापाचेही बाप ब्राह्मणांचा तुला मत्सर, कोणरे तू ? तू तर मच्छर भरला तुझा पापघडा, गप! नाही तर होईल राडा खाऊन फुकटचं घबाड, वाकडं झालं तुझं थोबाड याला ओरबाड त्याला ओरबाड, तू तर लबाडांचा लबाड.’
केतकीच्या या पोस्टनंतर राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जवळपास 10 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. ठाणे पोलिसांनी शनिवारी केतकीला अटक केली होती. यावेळी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तिच्यावर अंडी आणि शाईफेक केली होती. तसेच तिला आमच्या ताब्यात द्या आम्ही तिला धडा शिकवतो, अशा धमक्या देखील दिल्या होत्या.