Share

लोक माझा तिरस्कार करताहेत, मला शिव्या देताहेत, पण त्यामुळे मी आनंदी आहे; अभिनेत्याचे वक्तव्य

chinmay

‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट पाहिलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला फारूख मल्लिक उर्फ बिट्टाचा फार राग येत आहे. बिट्टा या भूमिकेचा प्रत्येकालाच किळस आणि तिरस्कार वाटत आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर अनेकजण शिवीगाळही करत आहेत. लोकांना द्वेष येईल इतक्या चांगल्या पद्धतीने ही भूमिका मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकरने पडद्यावर साकारली आहे. तर लोक त्यांचा राग व्यक्त करत माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी चांगली गोष्ट असल्याचे चिन्मयने म्हटले आहे.

आजतकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना चिन्मयने ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटासंबंधित अनेक किस्से शेअर केले. यावेळी बिट्टा या भूमिकेबाबत बोलताना चिन्मयने म्हटले की, ‘पहिल्यांदा जेव्हा मला बिट्टा ही भूमिका ऑफर करण्यात आली तेव्हा मी खूप आश्चर्यचकित झालो होतो. कारण मी मराठी आहे आणि ही भूमिका पूर्णपणे माझ्या व्यक्तिरेखाच्या विरोधात आहे. पण त्याचवेळी मला आनंदही झाला की, त्यांनी मला या भूमिकेसाठी योग्य समजले’.

चिन्मयने पुढे सांगितले की, ‘कास्टिंगचे सर्व श्रेय पल्लवी जोशी यांनाच जाते. पल्लवी जोशी आणि मी एका चित्रपटात एकत्र काम केलं होतं. त्यांनीच बिट्टा भूमिकेसाठी माझं नाव सुचवलं होतं. पण एका सामान्य कलाकाराप्रमाणे मीसुद्धा स्क्रीन टेस्ट, ऑडिशन असे सर्व टप्पे पार करून या भूमिकेपर्यंत पोहोचलो’.

भूमिकेबाबत सांगताना चिन्मयने म्हटले की, ‘जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा माझी प्रतिक्रियासुद्धा तशीच होती जशी आता चित्रपट पाहून लोक देत आहेत. मी त्याचवेळी माझ्या भूमिकेबाबत कॉन्फिन्डेंट झालो होतो. मला माहित आहे की माझी भूमिका फारच क्रूर आहे. चित्रपट जे संदेश देऊ इच्छित आहे त्यानुसार मला त्या भूमिकेनुसार क्रूर होणे गरजेचे होते. चित्रपटाचे कथानक सत्य घटनांवर आधारित आहे. तसेच यामधील अनेक भूमिकासुद्धा खऱ्या आयुष्यातील लोकांशी प्रेरित आहेत’.

यावेळी चिन्मयने त्याच्या भूमिकेसाठी लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिक्रियांबाबत बोलताना सांगितले की, ‘कुटुंबीय आणि मित्रपरिवार मला मेसेज करून माझ्या भूमिकेचा तिरस्कार वाटतो, असे सांगत माझ्या अभिनयाचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण मेसेज करून, राग काढत शिवीगाळ करत आहेत. लोकांमधील तो राग मी जागृत करू शकलो याचा मला आनंद आहे. लोक माझा तिरस्कार करत आहेत, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे’.

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादाबाबत चिन्मयने म्हटले की, ‘मला वाटलं नव्हतं की चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाबाबत मी असा विचार केला होता की, चित्रपट तिसऱ्या आठवड्यानंतर चांगली कमाई करेल. पण चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमाल करत जबरदस्त कमाई केली’.

दरम्यान, चिन्मयने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘शांघाई’ आणि ‘भावेश जोशी’ या चित्रपटातही काम केले. द काश्मीर फाईल्स चित्रपटापूर्वी त्याचा पावनखिंड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. तर या भूमिकेतील त्याच्या अभिनयाचेही प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

महत्त्वाच्या बातम्या :
आई कुठे काय करते’फेम अरुंधतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला मुलीचा वाढदिवस; चाहते म्हणाले, वाह…
‘द कश्मीर फाइल्स’मुळे विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ दर्जाची सुरक्षा; CRPF कडून होणार रक्षण
‘मी चित्रपट पाहिला नाही पण..,’ ‘द काश्मीर फाइल्स’वर नाना पाटेकरांचं मोठं विधान

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now