अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) सध्या ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे फारच चर्चेत आहे. या चित्रपटात चिन्मयने फारूख मलिक उर्फ बिट्टा कराटे नावाच्या दहशतवाद्याची भूमिका साकारली आहे. ही भूमिका पाहून त्याच्यावर राग येईल, त्याचा किळस आणि तिरस्कार वाटेल इतका चांगला अभिनय केल्याचे म्हणत चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. यादरम्यान चिन्मयने नुकतंच एका मुलाखतीत बोलताना त्याच्या या भूमिकेची तयारी आणि चित्रपटाबद्दल होणारी टीका यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चिन्मयने नुकतीच न्यूज १८ लोकमतला मुलाखत दिली. यावेळी बिट्टा या भूमिकेबाबत बोलताना चिन्मयने म्हटले की, ‘मी या चित्रपटासाठी फार मेहनत घेतली. बिट्टाच्या भूमिकेसाठी माझं नाव पल्लवी जोशी यांनी सुचवलं होतं. पल्लवी आणि मी एका मराठी मालिकेत एकत्र काम केलं होतं. पल्लवी मला चांगल्या ओळखतात. पण सामान्य कलाकाराप्रमाणे मीसुद्धा स्क्रीन टेस्ट, ऑडिशन असे सर्व टप्पे पार करून या भूमिकेपर्यंत पोहोचलो’.
‘या भूमिकेसाठी मला काही डायलॉग्स वाचायला देण्यात आले होते. माझे सर्व डायलॉग ऐकून आणि माझी चाचणी घेतल्यानंतरच माझी बिट्टासाठी निवड करण्यात आली होती. तसेच बिट्टाची भूमिका चांगल्या प्रकारे रंगवण्यासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही बरंच साहित्य उपलब्ध करून दिलं होतं’, असे चिन्मयने सांगितले.
बिट्टाच्या भूमिकेच्या तयारीबाबत बोलताना चिन्मयने म्हटले की, ‘बिट्टा या भूमिकेसाठी मला खूप तयारी करावी लागली. यासाठी मी बिट्टाचे काही जुने व्हिडिओ पाहिले. ते व्हिडिओ मी वारंवार पाहत होतो. तसेच यासंदर्भातील अनेक कागदपत्रेही मी वाचत होतो. त्यामुळेच मला भूमिकेला योग्य न्याय देता आलं’.
यावेळी काही सिनेमागृहात बिट्टाचे संवाद म्यूट करून दाखवण्यात येत आहेत. याबद्दल बोलताना चिन्मयने म्हटले की, ‘बिट्टाच्या संवादामुळे वाद होतील असे चित्रपटात काही नाही. पण तरीही ते म्यूट करून दाखवण्यात येत आहेत. पण ते चुकीचं आहे. बिट्टाच्या तोंडचे संवाद हा सिनेमाचा अविभाज्य भाग आहे. ते चित्रपटातील एक पात्र आहे. मी त्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संवादामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, असे मला वाटत नाही’.
दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट ११ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
माझे मन काश्मिरसाठी रडते, राजकारण आणि दहशतवादाने.., अनुपम खेर यांचे ते ट्विट पुन्हा झाले व्हायरल
काश्मिर फाईल्सबाबत अजित पवारांनी थेट केंद्र सरकारकडे केली मागणी; म्हणाले, महाराष्ट्रातच नव्हे तर..
मला असं वाटतं, सर्वांनी माझ्या पात्राचा तिरस्कार करावा; ‘द काश्मीर फाइल्स’ची अभिनेत्री अशी का म्हणाली?