छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाबाबत जोरदार चर्चा सुरु होती. तर आज ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आज चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. यादरम्यान या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) नुकतीच एका मुलाखतीत बोलताना चित्रपटासंबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या.
चिन्मय मांडेलकरने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवाजी महाराजांची भूमिका साकारणे, चित्रपट साकारताना आलेल्या अडचणी, चित्रपटासंबंधित आठवणी अशा अनेक गोष्टींबाबत बोलला. यावेळी चिन्मयने सांगितले की, एकदा का तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोशाखात शिरला की, तो कोणासोबतही फोटो काढत नाही.
चिन्मयने म्हटले की, ‘सेटवर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असताना त्यांची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करतो. त्या पोशाखात शिरलो की मी त्यावर कोणासोबतही फोटो काढत नाही. कारण शेवटी तो मी नाही तर ते महाराजांचं एक रूप आहे. मी सेटवर महाराजांच्या रूपात आलो की, सर्वत्र शांतता पसरते. जिरेटोप काढल्यावर मी पुन्हा चिन्मय असतो’.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेबाबत बोलताना त्याने सांगितले की, ही भूमिका साकारणं त्याच्यासाठी एक आव्हान होतं. चिन्मयने म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिष्ठेला जराही नख न लावता पावनखिंडीचा हा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं एक मोठं आव्हान होतं. यापूर्वी ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’मध्येही मी शिवरायांची व्यक्तिरेखा साकारली. पण प्रत्येकाचा एक वेगळा पैलू आहे. मला प्रत्येकवेळी शिवाजी महाराज नव्याने कळत गेले’.
दरम्यान, ‘पावनखिंड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे. हा चित्रपट म्हणजे दिग्पाल यांनी संकल्प केलेल्या ‘शिवराज अष्टका’तील तिसरं पुष्प आहे. यापूर्वी दिग्पाल यांच्या ‘फर्जंद’ आणि ‘फत्तेशिखस्त’ या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. तर आता ‘पावनखिंड’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि मावळ्यांनी पावनखिंडीत दिलेल्या लढ्याचा थरार चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आल्मंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. चिन्मयसोबत या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, समीर धर्माधिकार असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
सलमान आणि कतरिनाचे सेटवरील खाजगी फोटो झाले लीक, सोशल मिडीयावर चर्चांना उधाण
सुकेशसोबतचे खासगी फोटो लीक झाल्यानंतर जॅकलीन पहिल्यांदाच दिसली इतकी आनंदी, पहा व्हिडीओ
PHOTO: बाथटबमध्ये लहान मुलासारखे झोपलेले दिसले अनुपम खेर, चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सचा पडला पाऊस