पुण्याच्या कोंडवा परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आई वडिलांनी आपल्या पोटच्या मुलाला एका रूममध्ये तब्बल दोन वर्षे कोंडून ठेवले एवढेच नाही तर त्या रूममध्ये त्याच्यासोबत रानटी कुत्री सुद्धा ठेवली होती. त्यामुळे मुलावर जो परिणाम झाला वाचून तुम्हाला धक्का बसेल.
ही धक्कादायक घटना पुण्याच्या कोंडवा परिसरातील कुष्णाई इमारतीमधून उघड झाली. या इमारतीत राहणाऱ्या एका दाम्पत्यानी त्यांच्या पोटच्या मुलाला एका खोलीत एक दोन दिवस नाही तर तब्बल 2 वर्षे कोंडून ठेवले होते. एवढेच नाही तर, त्यांनी त्याच्यासोबत 22 रानटी कुत्री सुद्धा ठेवली होती.
खेळण्या बागडण्याच्या वयात चिमुकल्या मुलासोबत त्याच्या आई वडिलांनी केलेले हे कृत्य ऐकून सर्वांना धक्का बसला. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच खोलीत बंद असल्याने आणि सोबतच्या कुत्र्यांमुळे तो माणूस आहे हेच चिमुकला मुलगा विसरुन गेला होता. सुदैवाने ही घटना चाईल्ड लाईनच्या माध्यमातून उघड झाली.
चाईल्ड लाईनच्या माध्यमातून ही घटना पोलिसांना कळाली. पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोंडव्यातील कुष्णाई इमारतीमधील संबंधित खोलीजवळ पोलीस पोहोचले. घराच्या आतमधून कुत्र्यांच्या भूंकण्याचा खूप आवाज येत होता. घरात शिरणं पोलिसांना कठीण जात होतं.
मुलाला ज्या ठिकाणी कोंडण्यात आलं होतं त्या खोलीचा दरवाजा उघडताच पोलिसांनी जे दृष्य पाहिले ते पाहून पोलीस हादरले. खोलीत घाणीचं साम्राज्य होतं. कुत्र्यांची विष्ठा ठिकठिकाणी पडली होती. संपूर्ण घरात दुर्गंधी होती. या दुर्गंधीत आणि 22 कुत्र्यांसोबत एक 11 वर्षांचा चिमुकला होता.
मुलाची अवस्था दयनीय होती. आहार नसल्याने शरीर पूर्ण क्षीण झालं होतं. मुलाची वर्तणूक एखाद्या पशू प्रमाणे होती. माहितीनुसार, त्याला कुत्र्यांसोबत राहून तशीच भुंकण्याची, दोन हात आणि पायावर चालण्याची सवय लागली होती. शिवाय तो कुत्र्यासारखा चावत देखील होता.
मुलाची ही सगळी अवस्था पाहून, पोलिसांनी आणि चाईल्ड लाइनने मिळून तात्काळ त्या मुलाची सुटका केली . मुलाला बालसुधार गृहात पाठवले. पोलिसांनी त्या मुलाच्या निर्दयी आई वडिलांना तात्काळ अटक केली. स्थानिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार या मुलाचे आईवडिल विक्षिप्त आहेत. मात्र, मुलाच्या पालकांवर बाल संगोपन आणि संरक्षण कायद्या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.