नुकताच फडणवीस-शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात शिंदे गटातील अनेक आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागली. मात्र, ज्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांची नाराजी देखील समोर आली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांना देखील संधी मिळाली नाही.
यामुळे शहाजी पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठी निराशा निर्माण झाली आहे. २० वर्षानंतरही सांगोल्याला मंत्रीपदाच्या दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता शहाजी पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचं शहाजी पाटील यांनी सांगितलं आहे.
शिंदे गटातील शहाजीबापू पाटील हे काय झाडी, काय डोंगार…ओकेच’ या डायलॉग बाजीमुळे नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होईल अशी आशा समर्थकांमध्ये होती. अनेक समर्थक मंत्री पदाबाबत उघडपणे बोलून दाखवीत होते.
एवढेच नाही तर शहाजीबापू पाटील समर्थकांनी त्यांच्या मंत्रिपदाबाबत पैजाही लावल्या होत्या. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत शहाजी पाटील हे सुरुवातीपासून त्यांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांची मंत्रीपदी वर्णी लागेल अशी आशा समर्थकांना होती.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून त्यांनी शिंदे यांचा हात धरला होता. महाविकास आघाडीचे सरकार असताना शहाजी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून तालुक्यासाठी अनेक मोठी कामे करून घेतली होती. यावरून त्यांचे शिंदे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचे लक्षात येते.
त्यामुळे शिंदे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शहाजी पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागेल, असे सर्वत्र बोलले जात होते. मात्र, तसे झाले नाही. याबाबत शहाजी पाटील हे नाराज नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मात्र, नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत बोलताना शहाजी पाटील म्हणाले, मला मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे मी नाराज नाही. मुख्यमंत्री शिंदे मला मोठी जबाबदारी देणार आहेत. मला त्यांनी कोणतीही जबाबदारी दिली तरी मी ती यशस्वीपणे पार पाडेन असे शहाजीबापू पाटील म्हणाले.