सध्या वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्पावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला जाण्यामागे शिंदे फडणवीस सरकार जबाबदार आहे, असे विरोधक म्हणत आहेत, तर महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प गेला असे सरकारकडून आरोप करण्यात येत आहेत.
यावर आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘सांगा आता हे कोण बोलले होते, ते पण सभागृहात’ असा दानवेंनी व्हिडीओवरती प्रश्न केला आहे.
या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री शिंदे हे राज्यात कसे मोठे उद्योग आणि गुंतवणूक येत आहे हे सांगत असतांना वेदांताचा उल्लेख करतांना दिसत आहेत. वेदांतावाला आपल्याकडे ४ लाख कोटींची गुतंवणूक करत असल्याची माहिती शिंदे या व्हिडिओमध्ये सभागृहाला देतांना दिसत आहे.
यावरून अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत `सांगा आता हे कोण बोलले होते. ते पण सभागृहात` असे म्हणत टीका केली आहे. सध्या हा व्हिडीओ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासाठी विरोधकांनी लगावलेली चपराक असल्याचं बोललं जात आहे.
https://twitter.com/iambadasdanve/status/1570047508868485127?t=jP7atW3lJmQfpgVxG7FAAA&s=19
दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्याला तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. ‘मागील दोन वर्षात या प्रकल्पासाठी जो रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो कमी पडला,’ त्यामुळेच प्रकल्प गुजरातला केला असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तर राजकीय दबावापोटी हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेण्याचा प्रयत्न असून महाराष्ट्राला आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्यांनी महाराष्ट्राचं हित पाहिलं पाहिजे. कुणाच्याही दबावाला बळी पडू नये, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.