Share

भाजप नेतृत्वाच्या निर्णयाची वाट पाहत मुख्यमंत्री शिंदे १२ तास महाराष्ट्र सदनात बसून

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी मध्यरात्री मुंबईहून दिल्लीत दाखल झाले होते, त्यानंतर मंगळवारची दुपार उलटून गेली तरी ते नवीन महाराष्ट्र सदनाच्या मुख्यमंत्री कक्षामध्ये १२ तास बसून होते. या १२ तासांत भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना भेटीची वेळ दिली नसल्याचं समोर आलं आहे.

शिवसेनेच्या संसदीय पक्षात फूट पडली असून १२ खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. या सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. तसेच लोकसभेत वेगळा गट करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. याच संदर्भातील १२ खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र मंगळवारी दुपारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना देण्यात आलं.

ते स्वाक्षऱ्या असलेले पत्र साधारण मंगळवारच्या दुपारी एकच्या सुमारास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं होतं. या पत्रात लोकसभेत शिंदे गटाला मान्यता द्यावी, शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांना मान्यता द्यावी तसेच शिंदे गटाच्या खासदारांची आसनव्यवस्था बदलावी असे महत्वाचे मुद्दे होते.

त्यानंतर, बिर्ला यांनी शिंदे गटातील खासदारांच्या शिष्टमंडळाला सूचना केल्या की, वेगळ्या गटाला मान्यता देण्यासाठी किमान दोन तृतीयांश खासदारांची गरज आहे. किमान १२ खासदारांची शिंदे गटाला आवश्यकता आहे. तुमच्या गटाकडे पुरुसे संख्याबळ आहे का? असेल तर नेमकं संख्याबळ किती स्पष्ट करणारे पत्र मुख्य प्रतोद भावना गवळी यांच्या स्वाक्षरीने पुन्हा सादर करा.

शिंदे गटाने दिलेले पत्र बिर्ला यांनी अधिकृतपणे स्वीकारले नसल्यामुळे मुख्य प्रतोद गवळी यांनी १२ खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र पुन्हा बिर्ला यांना सादर केलं. ते बिर्ला यांनी स्वीकारलं. दरम्यान, शिंदे गटातील खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची महाराष्ट्र सदनात जाऊन भेट घेतली.

जोपर्यंत बिर्ला शिंदे गटातील खासदारांना अधिकृतपणे मान्यता देणार नाहीत, तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीसाठी वेळ देणार नाहीत. त्यामुळे शिंदे दिल्लीत जाऊन १२ तास झाले तरी त्यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्यापैकी कोणाची भेट घेता आली नाही. नुकतेच बिर्ला यांनी शिंदे गटाच्या मागण्या मान्य केल्या आहेत.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now