नुकतेच मिरा-भाईंदर पालिका अर्थसंकल्पातील नगरसेवक स्वेच्छा निधीची वाढीव तरतूद तसेच महासभेत आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांची यादी रद्द करण्यात आली आहे. भाजपला यामुळे मोठा धक्का बसला आहे.
माहितीनुसार, महापालिका आयुक्तांच्या मागणीनुसार ही कार्यवाही करण्यात आली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने बुधवारी या संदर्भात आदेश जारी केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगरविकास विभागाने तत्कालीन सत्ताधारी भाजपने केलेली तरतूद व कामे रद्द केली.
यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा भाजपला मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, नगरविकास विभागाच्या आदेशानुसार स्वेच्छा निधी पालिकेच्या वार्षिक उत्पन्नाच्या जास्तीत जास्त दोन टक्के असणे अनिवार्य आहे, असा दाखला मिरा-भाईंदर पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी दिला आहे.
त्याचबरोबर पालिकेचे वार्षिक उत्पन्न सुमारे एक हजार ११ कोटी रुपये इतके असतानाही महासभेने २५ कोटी इतकी भरीव तरतूद केल्याने केवळ १५ कोटींचा निधी वापरास मान्यता देण्यात यावी, असे ढोले म्हणाले.
दरम्यान, ढोले यांनी प्रशासनाने कोणत्याही विकासकामांच्या यादीचा प्रस्ताव आर्थिक आणि प्रशासकीय मान्यतेसाठी महासभेला सादर केलेला नसताना परस्पर मंजूर करण्यात आल्याने ती रद्द करण्यात यावी, अशी विनंती राज्य सरकारकडे मे महिन्यात केली होती.
त्यानंतर आता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महासभेकडून अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वाढीव स्वेच्छा निधीची तरतूद व मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांची यादी ही पालिकेच्या आर्थिक तसेच लोकहिताच्या विरुद्ध असल्याचा ठपका ठेवत रद्द करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.
मिरा-भाईंदर पालिकेच्या २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षाच्या दोन हजार २५२ कोटींचा अर्थसंकल्पाला मार्च महिन्यात पार पडलेल्या विशेष महासभेत सत्ताधारी भाजपकडून बहुमताच्या जोरावर मंजुरी देण्यात आली होती. यामध्ये पालिकेच्या आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, नगरसेवक आदींसाठी राखीव असणाऱ्या १५ कोटींच्या निधीत तब्बल १० कोटींची वाढ करत २५ कोटींची तरतूद करण्यात आली होती.
अर्थसंकल्पाला मंजुरी देताना ६१८ कोटी रुपये खर्चाच्या १४४ कामांच्या यादीला आर्थिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव भाजपकडून मंजूर करण्यात आला. मात्र आता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने ही यादीच रद्द केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.