अजूनही सत्ताधारी नेते राज यांना लक्ष करत आहेत. राज ठाकरे यांच्या सभेबाबत खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. राज यांच्या सभेला जास्त महत्त्व देऊ नका, असे म्हणत त्यांनी पवारांनी राज यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
तर आता आणखी एका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने राज यांच्यावर टीका केली आहे. राज यांच्या बदलत्या भुमिकांवर त्यांनी बोट ठेवले आहे. याबाबत बोलताना त्यांनी राज ठाकरेंची तुलना पिंजरा सिनेमातील मास्तरसोबत केली आहे. तर जाणून घेऊया सविस्तर..
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. ‘राज ठाकरेंनी आमच्यासोबत मिळून भाजपविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या,’ असं त्यांनी म्हंटले आहे. राज यांनी केलेल्या टीकेवर बोलताना भुजबळ यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.
माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, ‘राज ठाकरेंनी आमच्यासोबत मिळून भाजपविरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. पिंजरा सिनेमातील मास्टरांचं काय झालं? आधी त्यांनी तमाशाला विरोध केला नंतर त्याच तमाशातील कमळीच्या मागे लागले आणि त्याच तमाशात तुणतुण वाजवायला बसले.’
दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलेच तापले आहे. वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप – प्रत्यारोपांचा जणू काही जंगी आखाडाच रंगला आहे. हनुमान चालीसाच्या पठणावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात आली.