Share

छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, नेमकं काय घडलं?

नुकतीच छत्रपती संभाजी राजे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बैठकीत मराठा आरक्षणावर काहीही चर्चा झाली नाही यावरून मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शुक्रवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती आणि मराठा मोर्चाचे नेते उपस्थित होते.

मात्र, या बैठकीत बोलूच दिलं नसल्याचा आरोप आता मराठा समाजाच्या नेत्यांनी केला आहे. तसेच, छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्व मान्य नाही, मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत बैठक बोलावलेली असताना सर्वांना बोलू द्यायला हवे होते, मात्र समाजाच्या लोकांना बोलण्याची संधी दिली नाही असा दावादेखील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे.

मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संभाजीराजे छत्रपती यांच्यावर टीका केली की, नेतृत्व करण्याची जबाबदारी यांना कोणी दिली? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे?आम्हाला अजिबात मान्य नाही. आमचं कुणीही नेतृत्व नाही हे आम्ही पहिल्यापासून सांगितलं होतं.

छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व आहे, तुम्ही अंधारात बैठका घेता नेमकं तुमचं चाललंय काय? मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व करणारे कुणीही नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातून मोर्चा सुरू झाला आहे. आम्ही सगळे त्या मोर्चाचे शिलेदार आहोत, असे म्हणाले.

तसेच जवळचा एखादा माणूस हाताशी धरून आणि त्या नेतृत्वाला पुढे करून जर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तर लक्षात ठेवा, तुम्हाला पळता भुई थोडी होईल, अशी अवस्था तुमची करू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिला.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now