Chandrashekhar Bawankule: आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपवर जोरदार टीका करत 70 हजार कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाचा उल्लेख केला. ज्यांनी आरोप केले, त्यांच्यासोबतच आज सत्तेत बसलो आहे, असा टोला देत त्यांनी भाजप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
या वक्तव्यावर भाजपकडून प्रतिक्रिया उमटताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी मोजक्या पण धारदार शब्दांत प्रत्युत्तर दिलं. 70 हजार कोटींच्या प्रकरणाची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही, निकाल लागलेला नाही, हे लक्षात ठेवावं, असा थेट इशारा त्यांनी दिला. आम्ही जर मागची पानं उघडायला सुरुवात केली, तर बोलायला फारसं काही उरणार नाही, असं स्पष्ट सूचक विधान त्यांनी केलं.
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की ही बाब कोणत्याही नेत्यासाठी अभिमानास्पद नाही. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना त्यावरून राजकीय वक्तव्य करणं योग्य ठरत नाही. निकाल काय लागतो, त्यावर पुढची दिशा ठरेल. छोट्या महापालिका निवडणुकीसाठी अशा संवेदनशील मुद्द्यांवरून महायुतीत मतभेद निर्माण होऊ नयेत, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
महायुती समन्वय बैठकीत एकमेकांवर टीका टाळायचं ठरलं होतं, तरीही अशी विधाने का केली जात आहेत, याचं आश्चर्य वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक वर्षे सत्ता हातात असताना घेतलेल्या निर्णयांची उजळणी करायची आमची इच्छा नाही, मात्र गरज पडली तर सत्य समोर आणायला आम्ही मागे राहणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दिवंगत विलासराव देशमुखांबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, आधी संपूर्ण विधान ऐकून घेईन, त्यानंतरच बोलणं योग्य ठरेल, असं सावध वक्तव्य केलं. एकूणच, सत्तेत असूनही उफाळून आलेली ही वाक्ययुद्धाची ठिणगी आगामी स्थानिक निवडणुकांआधी राजकीय तापमान वाढवणारी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे.