Share

अजानसाठी चंद्रकांत पाटलांनी सांगीतला नामी उपाय; मुस्लिम समाज ‘हा’ उपाय स्विकारणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवर असलेल्या भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुस्लिम बांधवांना नमाज पाडायचा असेल तर मशिदीमध्येच अजान ऐकू येईल अशी व्यवस्था करा असे वक्तव्य केले आहे.

भाजपच्या वतीने काल बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाअंतर्गत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोहळा यशवंत राव चव्हाण सेंटरला पार पडला होता. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. दरम्यान, त्यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात आणि गणेश नाईक यांच्याबद्दल आपलं मत व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुस्लिमांना मशिदीमध्ये नमाज पडायची असेल तर केवळ त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनाच आवाज ऐकू येईल एवढाच आवाज तिथे असावा. भोंग्यांमुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी मुस्लिम समाजाने घ्यावी, मशिदीमध्येच अजान ऐकू येईल अशी व्यवस्था करावी.

भाजपच्या ‘पोलखोल यात्रा’ रथावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीका महाविकास आघाडी सरकारवर केली. तसेच या हल्ल्याबाबत भाजप सरकारविरोधात भव्य मोर्चा काढणार असून तोडफोड करणाऱ्या गुंडांना अटक करावीच लागेल असा इशाराही पाटील यांनी दिला.

गणेश नाईक यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षावर अश्या पद्धतीचे अनेक आरोप झाले आहेत. त्यामुळे गणेश नाईक यांच्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात योग्य ती शहानिशा होईल आणि न्यायालयाकडून नाईक यांना न्याय मिळेल.

दरम्यान, पारितोषिक वितरण समारंभ सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, श्रीकांत भारतीय, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानच्या संयोजिका डॉ.मा.शुभा फरांदे पाध्ये इत्यादी उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टिकेनंतर आता महाविकास आघाडीची काय प्रतिक्रिया असेल पाहावं लागेल.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now