त्यामुळे विधान परिषदेसाठीही खलबते सुरू आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने यादी जाहीर केली आहे. पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडेंना यामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना संधी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना मात्र संधी मिळालेली नाही, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. राजकीय वर्तुळात राज्यसभा तसेच विधान परिषदेसाठीही पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार अशा चर्चा सुरू होत्या. मात्र असे असताना देखील राज्यसभेतही पंकजांना उमेदवारी डावलण्यात आली.
यावर अद्याप पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ते याबाबत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. ‘पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता,’ असे पाटील यांनी म्हटले होते.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘केंद्रीय संघटनेने घेतलेला निर्णय हा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून मान्य करायचा असतो. पंकजा मुंडे यांच्या नावासाठी फडणवीस आणि आम्ही सगळ्यांना प्रयत्न केले होते. पण केंद्रीय संघटनेने त्यांच्याबाबत काही भविष्यातील विचार केला असेल.’
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी दिली आहे. तर दुसरीकडे, पंकजा मुंडे यांचेही पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातून त्यांची राज्यात घरवापसी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.