समाजात धर्म आणि जात यांच्यातील भेदभाव वाढत चालला आहे. या भेदभावामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. अशातच एका ब्राम्हण तरुणीने चक्क ओळखपत्रातून आपलं आडनाव आणि धर्म काढून टाकण्याची परवानगी देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
संबंधित घटना गुजरात मधील आहे. गुजरात मधील चोरवाड शहरातील काजल मंजुला नामक तरुणीने तिच्या ओळखपत्रावरील तिच्या नावामागे असणारा जात आणि धर्माचा उल्लेख काढून टाकण्याची विनंती गुजरात हायकोर्टाकडे केली आहे.
तरुणी सुरत येथील एका निवारागृहात राहते. ब्राम्हण असून देखील तिनं हे पाऊल उचलले, यामुळे लोकांना आश्चर्य वाटत आहे. तिने हे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण म्हणजे तिला समाजात दिसत असणारा भेदभाव मान्य नाही. समाजातील भेदभाव पाहून तिला त्रास होत आहे.
जातीविषयीचं आपलं मत व्यक्त करताना तरुणी म्हणते, माझ्या नावामागे माझी जात आणि धर्माचा उल्लेख आहे, आणि या उल्लेखाची मला अडचण आहे. माझ्या नावामागे लागलेला धर्म आणि जातीची ओळख मला इतर लोकांपासून वेगळं करते. त्यामुळे मला आता धर्म आणि जातीची ओळख नकोय. लोकांनी मला एक सामान्य व्यक्ती म्हणून बघावं अशी माझी इच्छा आहे.
तसेच म्हणाली, मी चोरवाड येथे शाळेत असताना, माझ्या मित्र मैत्रिणींच्या डब्यातील जेवण करायचे. मात्र मी ब्राम्हण असल्याने माझ्या जातीतील इतर लोकांना माझी ही गोष्ट आवडत नव्हती. त्यामुळे इतर ब्राम्हण जातीतील लोक मला टाळायला लागले. शेवटी मी निराश झाले.
जातीभेदामुळे मला मानसिक त्रास झाला. शेवटी मी माझं घर सोडलं आणि सुरतमध्ये निवारागृहात आले. मला इथे लोक विचारतात तुम्ही ब्राम्हण असून, निवारागृहात का राहता. नोकरीमध्ये अर्ज करताना देखील मला विचित्र पद्धतीने वागवतात. मी हे सगळं सहन केलं आहे म्हणून मला आता माझ्या नावामागे असणाऱ्या धर्म जातीची ओळख काढून टाकायची आहे.