महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीपाठोपाठ सीबीआयने आता त्यांना क्लिन चीट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे आता ईडीने स्पष्ट केले आहे.
नुकतेच महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. त्यामुळे आता एवढ्या दिवस सुरू असणारी ईडी, सीबीआय ची पीडा आता संपली असे चित्र दिसत आहे. त्याचच हे उदाहरण, म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना मिळालेली क्लिन चीट असे म्हटले जात आहे.
श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. त्यामुळे ईडी ही मातोश्रीपर्यंत पोहोचली अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण, आता सत्तेतून पायउतार होताच उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात क्लिन चीट दिली आहे.
सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर झाला असून यामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या बाबतीत कोणतेही पुरावे आढळले नाहीत,त्यांचा थेट सहभाग देखील गैरव्यवहारात आढळला नाही, असं या रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.
श्रीधर पाटणकर यांच्या विरोधात युनियन बँक ऑफ इंडियाचे अधिकारी, ज्वेलर्स आणि सराफा ट्रेडिंग कंपनी पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांच्या विरोधात ८४.६ कोटी रुपयांच्या फसवणूक आणि बनावट खटल्याचा प्रकरणाचा तपास थांबवण्याबाबतचा अहवाल सीबीआय न्यायालयाने मंजूर केला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण तर, श्रीधर पाटणकर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्यात. हमसफर डिलरनं पाटणकरांच्या कंपनीला ३० कोटी कर्ज दिले होते. मात्र हमसफर ही कंपनी बनावट असल्याचा ईडीचा आरोप आहे.
नंदकिशोर चर्तुवेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीनं विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचं बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे.