करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ आणि अपहरण करून पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप एका महिलेने केला होता. याप्रकरणी संबंधित महिलेने येरवडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना अटक केली आहे.
करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना दुपारी पुणे न्यायालयासमोर हजार केले जाणार आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तक्रारदार महिला आणि अजयकुमार देडे हे उस्मानाबादचे रहिवासी आहेत. करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांची 2021 मध्ये ओळख झाली. त्यानंतर हे दोघे वारंवार फोनवर बोलू लागले.
करुणा शर्मा यांच्यासोबत ओळख झाल्यानंतर देडे दाम्पत्य पुण्यात स्थायिक झाले. त्यानंतरही करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांच्यात जास्त संपर्क होऊ लागला. या दोघांच्यात प्रेमसंबंध असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. 16 फेब्रुवारी 2022 रोजी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते भोसरीला घेऊन गेले.
तेथे तक्रारदार महिलेला करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांनी हॉकीस्टीकचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच घटस्फोट घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संबंधित महिलेने येरवडा पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तक्रारीनुसार पोलिसांनी करुणा शर्मा आणि अजयकुमार देडे यांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी देणे, अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही आज पुणे न्यायालायासमोर हजर केले जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव करीत आहेत.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा प्रकाशझोतात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी करुणा शर्मा यांच्यासोबतचे नाते धनंजय मुंडे यांनी उघडपणे सांगितले होते. त्यानंतर त्या कायम चर्चेत राहिल्या आहेत. येरवडा पोलिसांकडून त्यांना अटक केल्यामुळे पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. या अटकेमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.