सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. एकीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपांची मालिका लावली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते गृहविभागाच्या कारभारावर नाराज असलेलं दिसून येत आहे. गृहमंत्रीपद हे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, चपला फेकल्या. या घटनेनंतर राज्याच्या गृहविभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होऊ लागले. गृहमंत्रीपदात फेरबदल करण्याच्या चर्चा होऊ लागल्या.
आता राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गृहमंत्री पदावरुन दिलीप वळसे पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. मात्र, गृहमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या गळ्यात गृहमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. अशी चर्चा सुरू आहे.
माहितीनुसार, 1 मे पूर्वीच हा फेरबदल होईल असे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा(ईडी)कडून महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांवर छापेमारी सुरु आहे. दुसरीकडे महाराष्ट्र पोलीस किंबहुना गृहखातं भाजप नेत्यांविरोधात कठोर कारवाई करत नसल्याचा एक सूर महाविकास आघाडीतूनच उमटत होता. त्यामुळेही गृहखात्यातील फेरबदलाबाबत चर्चा होऊ लागली.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याबाबत एक सल्ला दिला होता की, गृहमंत्रीपद जे आहे, त्याचा दाखवा एकदा हिसका, दाखवा एकदा इंगा. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन चार लोकांना वर्षापूर्वीच टाकून दिलं असतं, तर ही परिस्थिती आली नसती, असे खडसे म्हणाले होते.
तसेच याआधी जेव्हा किरीट सोमय्या, नील सोमय्या यांना तसेच प्रवीण दरेकर यांनाही उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळाला. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील गृहखात्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गृहखात्याने अधिक सक्षम झालं पाहिजे, असे ते म्हणाले होते.