सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना केपटाउनच्या मैदानात सुरु आहे. केपटाउनमध्ये या कसोटीचा तिसरा दिवस उत्साहाने भरलेला होता. सामन्याच्या शेवटच्या तासात दोन्ही संघ आणि पंच यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. डीआरएसच्या निर्णयावरून वाद सुरू झाला, जो इतका वाढला की टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली स्टंपच्या माईकवर आला आणि आपला राग व्यक्त करत ओरडू लागला.
टीम इंडियाचे इतर खेळाडू आफ्रिकन ब्रॉडकास्टरवर भडकले आणि तेही स्टंपच्या माईकवर जाऊन वाईट बोलले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत हा गोंधळ सुरूच होता. झाले असे की, आफ्रिकेच्या दुसऱ्या डावातील २१व्या षटकापासून वादाला सुरुवात झाली. हे षटक ऑफस्पिनर आर अश्विनने केले. आर अश्विनने टाकलेला चेंडू डीन एल्गरच्या पॅडला जाऊन लागला. टीम इंडियाने एलबीडब्ल्यूचे आवाहन केले आणि पंच माराई इरास्मसनेही एल्गारला आऊट घोषित केले.
सुरुवातीला एल्गरलाही पंचांच्या निर्णयाशी सहमती वाटली, पण त्याने पुन्हा डीआरएसची मागणी केली. अश्विनचा चेंडू डीन एल्गरच्या गुडघ्याच्या खाली पॅडला लागला. चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याचे दिसून आले. जे पाहून भारतीय खेळाडू भलतेच नाराज झाल्याचे दिसून आले. त्यामुळे थर्ड अंपायरने एल्गरला नॉट आऊट दिला.
थर्ड अंपायरच्या या निर्णयाने फील्ड अंपायर माराई इरास्मस यांनाही आश्चर्य वाटले. या सामन्यातील तिसरे पंच एस. अल्लाउद्दीन पालेकर यांचा जन्म आफ्रिकेत झाला आहे. पालेकर यांचा हा निर्णय समोर आल्यानंतर भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली आणि संपूर्ण भारतीय संघ खूपच निराश दिसत होता. कोहलीला इतका राग आला की त्याने जमिनीवर पाय आपटला.
कोहलीच्या संतापानंतर केएल राहुल आणि अश्विनही भडकले. संपूर्ण दक्षिण आफ्रिका आमच्या ११ खेळाडूंविरुद्ध खेळत आहे, असे राहुलचे म्हणणे होते. ओव्हर संपल्यानंतर अश्विन आफ्रिकन ब्रॉडकास्टर सुपरस्पोर्टबद्दल स्टंप माइकवर म्हणाला की,’सुपरस्पोर्ट,तुम्हांला जिंकण्यासाठी चांगले मार्ग शोधायला हवेत.’
अश्विन आणि राहुल बोलल्यानंतर विराटही स्टंपच्या माईकजवळ पोहोचला आणि म्हणाला, “फक्त विरोधी संघावर नव्हे, तर स्वतःच्या संघावरही लक्ष द्या, नेहमी दुसऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असता.” विराट कोहलीने २०१८ साली झालेल्या सॅंडपेपर वादाच्या संदर्भात हे वक्तव्य केले आहे.
मात्र, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या या कृतीवर नाराज होता. कॉमेंट्री दरम्यान तो म्हणाला, विराटचे हे अतिशय बालिश कृत्य आहे. सामन्याचा निकाल काहीही असो, मात्र,कोणत्याही खेळाडूने अशा प्रकारची वृत्ती अंगीकारू नये.
गंभीर पुढे म्हणाला, ‘तो इतका अनुभवी खेळाडू आहे, त्याने केलेले हे कृत्य स्वीकारले जाऊ शकत नाही. जेव्हा अंपायरने आऊट दिले तेव्हा तुम्ही तंत्रज्ञानाबद्दल विनाकारण फुशारकी मारत होता. मला वाटते की राहुल द्रविड त्याच्याशी या कृतीबद्दल नक्कीच बोलेल कारण तो कर्णधार असताना असे कधीच घडले नाही.
महत्वाच्या बातम्या
स्वत:चं घर घेत असाल तर थांबा! भाड्याच्या घरात राहा आणि अशाप्रकारे घ्या २-३ घरे
ब्रम्हचर्येचे पालन, ४१ दिवस जमिनीवर झोपला, नखे कापली नाही; ‘या’ मंदिराला भेट देण्यासाठी अजयचा व्रत
राजा पळपूटा निघाला म्हणत मोदींवर टिका करणाऱ्या मराठी अभिनेत्याची मालिकेतून हकालपट्टी; वातावरण तापले