कडक उन्हाळा उंबरठ्यावर असताना अनेकांचे फ्रीज, कुलर, एसी असे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेण्यासाठी प्लँन बनत असतील. मात्र, आता इलेक्ट्रॉनिक उपकरणे घ्यायची असतील तर लवकर खरेदी करावी लागणार आहेत. कारण येत्या काळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
कच्च्या मालातील वाढ आणि अन्य कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी यापूर्वीही तीनवेळा दरवाढ केली आहे. त्यातच आता या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमती मध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याचे कारण म्हणजे युक्रेन आणि रशिया युद्ध सांगितले जात आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तांबे आणि अँल्युमिनियचे भाव गगनाला भिडले आहेत.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये प्रति टन 1.61 लाख रुपयांवर असणारा अँल्युमिनियमचा भाव आता 2.80 लाख रुपयांवर गेला आहे. त्याच वेळी तांब्याचा भावही प्रति टन 5.93 लाख रुपयांवरून 7.72 लाख रुपयांवर गेला आहे. ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अँप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’चे अध्यक्ष एरिक ब्रिगॅन्झा यांच्या मते गेल्या दोन वर्षांपासून कमॉडिटीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
‘गोदरेज अँप्लायन्सेस’चे बिझनेस हेड कमल नंदी यांच्या मते कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि उपकरणांच्या किमती यांच्यामध्ये केवळ 10 टक्के अंतर राहिले आहे. त्यामुळे कंपन्या आता हे अंतर वाढविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत 10 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
आता पुन्हा कच्च्या मालामध्ये वाढ झाल्याने कंपन्यांना दरवाढ केल्याशिवाय तरणोपाय नाही. कंपन्यांनी आतापर्यंत कमी मार्जिन स्वीकारले. मात्र, यापुढे तसे करणे परवडणारे नाही. त्यामुळे कंपन्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमतीत पाच ते सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
आधीच कोरोनाच्या काळात लोकांचे महागाईने कंबरडे मोडले आहे. त्यातच आता युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तांबे आणि अँल्युमिनियचे भाव गगनाला भिडले असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किंमती वाढल्या आहेत.