shivsena : शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतर अनेक आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळी अनेकांनी उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत. त्यांचे आमच्याकडे दुर्लक्ष होते. आम्हाला भेटू दिले जात नाही, अशा प्रकारची अनेक कारणं दिली. हेच कारण पुढे करत ज्या शिंदे गटात सामील झाल्या. त्या शिवसेनेच्या भायखळा मतदारसंघाच्या आमदार यामिनी जाधव यांनी पुन्हा एकदा हीच खंत बोलून दाखवली.
गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यामिनी जाधव यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आमदार यामिनी जाधव यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.
या भेटीनंतर मात्र यामिनी जाधव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यामिनी जाधव यांनी पुन्हा एकदा ‘मी कॅन्सरग्रस्त असताना, आपल्या पक्षातील एक महिला आमदार आजारी असताना पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी तिची साधी विचारपूस केली नाही,’ अशी खंत व्यक्त केली.
यावेळी बोलताना यामिनी जाधव यांचा रोख उद्धव ठाकरेंच्या दिशेने होता हे स्पष्ट होते. मात्र यापुढेही त्यांनी सांगितले की, ‘मी माजी मुख्यमंत्र्यांना अनेक आमदारांच्या पत्नींना कॅन्सर झाला असताना भेटायला जाताना पाहिले आहे. मग मीही मरणासन्न अवस्थेत गेल्यावर मला ते भेटायला येणार होते का?’ असा थेट सवालच यावेळी जाधव यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांच्यावर घनघाती आरोप करत पुढे जाधव म्हणाल्या, ‘४३ वर्षांपासून आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसैनिक म्हणून जगलो आणि शिवसैनिक म्हणूनच मरणार आहोत. माझे पती वयाच्या १७ व्या वर्षापासून शिवसेनेत आहेत. मागे जो निर्णय घेतला. ती वेळ आठवून आजही खूप वेदना होतात मात्र पर्याय नव्हता.’
‘ कॅन्सर झाला हे समजल्यानंतर मी तुटले होते. मात्र मला मतदारसंघातील शिवसैनिकांनी मोठा धीर दिला. माझ्या कुटुंबाची साथ होती. मी त्यांची कायम ऋणी आहे. मात्र ज्यांच्याकडून अपेक्षा होती. ते भेटायलाही आले नाहीत. त्यांनी दुर्लक्ष केले,’ अशी खदखद यावेळी यामिनी जाधव यांनी बोलून दाखवली.