Share

दलित नवरदेवाच्या मिरवणूकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर; ४८ घरे तोडली

मध्य प्रदेशातही यूपीप्रमाणेच सरकार बुलडोझरचा वापर करत आहे. राज्यातील राजगढ जिल्ह्यातील जिरापूरमध्ये एका दलिताच्या मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवला आहे. (Rajgarh, stone throwing, procession, Pradeep Sharma)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जिरापूरमध्ये किमान ४८ घरे जमीनदोस्त झाली. या घरांबाबत प्रशासनाने सांगितले की, ही सर्व सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक मशिदीच्या बाहेरून जात असताना अल्पसंख्याक समाजातील काही लोकांनी मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यावर आक्षेप घेतला.

राजगडचे पोलिस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी सांगितले की, रेकॉर्ड केलेल्या बयाणानुसार बारात्यांनी मशिदीजवळून जात असताना गाण्याचा आवाजही कमी केला होता. ते म्हणाले, परंतु दोन समुदायातील सदस्यांमध्ये बाचाबाची झाली आणि दगडफेक झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्यामध्ये सहा वर्षांच्या मुलासह किमान पाच जण जखमी झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही आठ जणांना अटक केली आहे.

प्रदीप शर्मा यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणातील आरोपींनी त्यांच्या समाजातील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे, मात्र अद्यापपर्यंत याबाबत पोलिसांकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. ते म्हणाले, सुरुवातीला एफआयआरमध्ये सहा जणांची नावे होती पण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. २१ आरोपींची ओळख पटली आहे. यातील सहा आरोपींचे शस्त्र परवानेही पोलिसांनी निलंबित केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर नोंदवल्यानंतर लगेचच जिरापूर वॉर्ड क्रमांकाच्या लोकांना नोटीस बजावण्यात आली. या नोटीसद्वारे त्यांना त्यांचे घर सरकारी जमिनीवर बांधल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ती तोडण्याची कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, जिल्हा अधिकार्‍यांच्या पथकाने जिरापूरमध्ये १८ घरे पाडली आणि आणखी ३० घरे अंशत: पाडली.

याबाबत माहिती देताना जिरापूरचे तहसीलदार ए.आर.चिरमण म्हणाले की, एकूण ४८ घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यापैकी १८ आरोपी आहेत. सार्वजनिक जमीन असलेल्या माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून आणखी ३० घरे बांधली आहेत.

महत्वाच्या बातम्या-
रामनवमीच्या हिंसाचारानंतर लोकांनी स्वत:च घरं पाडायला केली सुरूवात, बुलडोझर घेऊन पोहोचले प्रशासन
दिल्लीमध्ये अतिक्रमण विभागाच्या धडक कारवाया सुरूच, आता शाहीन बागमध्ये घुसणार बुलडोझर
३०० वर्ष जुन्या शिवमंदिरावर चालवला बुलडोझर, भाजप म्हणाले, हीच आहे का काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?
मैं निकला JCB लेके! पंतप्रधान बोरिस जॉन्सन गुजरातमध्ये चढले बुलडोझरवर, पुढं घडलं असं काही..

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now