सध्या राज्यात शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे दोन गट आहेत. या दोन्ही गटात सध्या आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. असे असताना, हिंगोलीतील शिवसेना नेत्यानं एक वादग्रस्त विधान केलं आहे.
हिंगोली शिवसेनेचे नेते बबनराव थोरात यांनी आवाहन केले की, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या गाड्या तुमच्या गावात येताच, तुम्ही फोडा तुमचा मातोश्री वरती सन्मान केला जाईल. असे खळबळजनक विधान थोरात यांनी केले.
आमदार आणि खासदारांच्या बंडामुळे विस्कळीत झालेल्या हिंगोली शिवसैनिकांमध्ये या वक्तव्याने खळबळ माजली आहे. हिंगोलीत उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसैनिकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आमदार संतोष बांगर, खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शनं केली.
हिंगोलीचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची आणि काँग्रेसमधून घरवापसी केलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. शिवसैनिकांनी जोरदार सत्कार केला. या सत्कार कार्यक्रमात नवनिर्वाचित संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं.
थोरात म्हणाले, तुम्हाला आता गावागावांमध्ये उभं राहावं लागेल. गद्दारांना विचारावं लागेल की, ज्या देवमाणसामुळे तुम्ही आमदार खासदार झालात, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. तुम्हाला आता गावात येऊ देणार नाही, जे जे जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक आहेत, या सगळ्यांना माझं आवाहन आहे की, ज्यांच्या कार्यक्षेत्रात या गद्दारांच्या गाड्या येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर केला जाईल.
त्यानंतर या कार्यक्रमात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आमदार बांगर, खासदार हेमंत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार गद्दार अश्या घोषणा दिल्या. संतोष बांगर आता माझ्या कानाखाली आवाज काढा, एक वेळ नाही तर हजार वेळ गद्दार म्हणतो, असे म्हणत संदेश देशमुख यांनी जोरदार घोषणा देत बांगर यांना यावेळी आव्हान दिले.