बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अंकित तिवारीने (Ankit Tiwari) दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलवर गैरवर्तनाचा आरोप लावला आहे. अंकितने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्याला दिल्लीतील हॉटेलमध्ये कशाप्रकारे त्रास देण्यात आला याबाबत सांगतिले आहे. तसेच या हॉटेलने जेवण न दिल्याने त्याच्या चार वर्षाच्या मुलीला उपाशी झोपावे लागल्याचेही त्याने म्हटले आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊया.
अंकितने गुरुवारी त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत अंकितने सांगितले की, दिल्ली येथील रॉयल प्लाजा हॉटेलमध्ये कशाप्रकारे हॉटेल स्टाफने त्याच्यासोबत गैरवर्तणूक केले. यासोबतच त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॉटेल रॉयल प्लाजा, नवी दिल्ली. याठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला एखाद्या कैद्याप्रमाणे वाटत आहे’.
अंकितने पुढे लिहिले की, ५ स्टार हॉटेलमध्ये ना पाणी आहे, ना जेवण. जेवणाची ऑर्डर देऊन ४ तास होऊन गेले आहेत. बाहेरून जेवण आणण्याची इथे परवानगी नाही. त्यामुळे दुसरा पर्याय नाही. काही बोललं तर स्टाफ बाऊन्सरची धमकी देतात, असे अंकितने या व्हिडिओत म्हटले. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
“HOTEL ROYAL PLAZA, NEW DELHI” Feeling like hostage with family…Pathetic experience.5 star hotel me na pani hai,food order kiye 4 ghante ho chuke hain…Outside food allowed nahi hai so no second option…Kuch bolo to staff bouncers ki dhamki de raha hai. pic.twitter.com/ewsN0HaP1c
— Ankit Tiwari (@officiallyAnkit) April 21, 2022
त्यानंतर आजतकने अंकितशी संपर्क साधला असता त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. अंकितने म्हटले की, ‘मी माझ्या कुटुंबीयांसोबत हरिद्वार येथे होतो. तिथून दिल्लीत एक दिवस राहून वृंदावनला जायची आमची योजना होती. त्यानुसार मी दिल्लीतील रॉयल प्लाजा येथे पत्नी आणि मुलीसोबत थांबलो. हा हॉटेल कनॉट प्लेस येथे आहे’.
‘यावेळी मी जेव्हा हॉटेलमध्ये चेक-इन करत होतो त्यावेळी काही जोडपे रिसेप्शनजवळ हॉटेल स्टाफसोबत भांडण करत होते. मला वाटलं की, त्यांची काही समस्या असेल. मी जवळपास साडेसात वाजता हॉटेलला पोहोचलो होतो. पण मला चेक-इन करण्यासाठी ४५ मिनिटंं लागले. त्यानंतर आम्ही आम्हाला देण्यात आलेल्या रूममध्ये गेलो’.
‘रूममध्ये गेल्यानंतर आम्ही जेवण ऑर्डर केलं. पण चार तास होऊन गेले तरी ना जेवण मिळालं ना पाणी. माझी मुलगी तीन वर्षांची आहे. तिच्यासाठी आम्ही दूध मागवलं. तर तेसुद्धा रूममध्ये पोहोचलं नाही. रूम सर्व्हिसमधून कोणी फोनच उचलत नव्हतं. त्यानंतर मी खाली जाऊन याबाबत विचारलो तर तिथे हॉटेल स्टाफ माझ्याशी उद्धटपणे वागू लागले. मला बोट दाखवून बोलण्यासोबतच त्यांनी सुरक्षारक्षक आणि बाऊंसर यांनाही बोलावून घेतले’.
अंकितने म्हटले की, ‘बाहेरून जेवण ऑर्डर करू देत नव्हते. तिथं एका हॉटेलसारखं नाही तर हॉस्टेलसारखं वाटत होतं. मी सारखं सारखं ओरडत होतो की, माझी मुलगी उपाशी झोपत आहे. तिच्यासाठी काही जेवायला द्या. तरीही माझं कोणी ऐकून घेत नव्हतं. उलट त्याच लोकांनी पोलिसांना बोलावून घेतलं. पोलिससुद्धा आम्हा ग्राहकांनाच चांगलं-वाईट बोलत होते. संपूर्ण रात्रभर आम्ही उपाशीच राहिलो. त्यानंतर सकाळी ४ वाजता आम्हाला जेवण देण्यात आलं. माझी मुलगी तर रडत रडतच झोपली होती’.
यावेळी चेकआऊटबाबत बोलताना अंकितने सांगितले की, ‘आम्ही हॉटेलवाल्यांना म्हटलो की, आमचे पैसे परत द्या, आम्ही निघून जातो. तर तेव्हाही हॉटेल मॅनेजमेंटने आमचे ऐकून घेतले नाही. हॉटेलचा मॅनेजर या परिस्थितीवर हसत होता. मी एवढ्या रात्री पत्नी आणि मुलांसोबत कुठे जाणार?’
अंकितने म्हटले की, ‘मी आतापर्यंत अशाप्रकारच्या पोस्ट कधीच केल्या नाही. पण या हॉटेलमधील निष्काळजीपणा आणि गैरवर्तन चुकीचे आहे. त्यामुळेच मला हा व्हिडिओ पोस्ट करावा लागला होता. हे लोक आमच्यासारख्या कलाकारांसोबत असे करू शकतात तर सामान्य माणसाशी कसे वागत असतील?’ दरम्यान, अंकितने याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘KGF 2’ चा रेकॉर्ड मोडणार शाहरुखचे ‘हे’ चित्रपट? ‘पठाण’ नंतर ‘या’ चित्रपटांद्वारे घालणार धुमाकूळ
काजलने सांगितला मुलाच्या जन्मानंतरचा ‘तो’ अनुभव; म्हणाली, पोस्टपार्टम ग्लॅमरस नसतो पण..
हा स्पर्धेक ठरला ‘Indian Idol Marathi’च्या पहिल्या सीझनचा विजेता; ट्रॉफीसह मिळाली एवढी मोठी रक्कम