बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून चित्रपटासाठी आलियाचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान चाहत्यांची ही उत्सुकता कायम ठेवत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला (Gangubai Kathiawadi Trailer) आहे. तर सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर चांगलाच चर्चेत आहे.
‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात आलिया भट्ट गंगूबाई यांची मुख्य भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, आलिया गंगूबाईच्या भूमिकेत दिसत असून ती कागदावर वाचून भाषण देण्यास सुरुवात करते. पण कागदावरील पहिलाच शब्द वाचून ती ते कागद फाडून फेकून देते. त्यानंतर ती तिची कथा सांगण्यास सुरुवात करते. ट्रेलरमध्ये पुढे गंगूबाई तिच्या हक्कांसाठी लढताना दिसून येते.
गंगूबाई निर्धार करते की, ती तिच्या मुलांना शिक्षणाचा हक्क आणि समाजात माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणार. ट्रेलरमध्ये आलिया गंगूबाई यांच्या भूमिकेत जबरदस्त अंदाजात दिसून येत आहे. ट्रेलरमधील तिचा दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि करडी नजर यावरून आलियाने गंगूबाई यांच्या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतल्याचे लक्षात येत आहे.
दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात गंगूबाई यांचा संघर्षमय जीवन दाखवण्यात आला आहे. गंगूबाई या गुजरातमधील काठियावाड येथे राहणाऱ्या होत्या. लहान वयातच त्यांचे एका मुलावर प्रेम झाले होते आणि लग्न करून त्या मुंबईत आल्या. पण मोठी स्वप्न पाहणाऱ्या गंगूबाई यांनी त्यांच्या पुढे काय वाढून ठेवलं जाणार आहे, याचा विचारही केला नव्हता.
गंगूबाई यांच्या नवऱ्यानेच त्यांना केवळ ५०० रूपयांसाठी कमाठीपुरा येथे कोठ्यावर विकले. त्यानंतर काही काळ वेश्याव्यवसायात संघर्षमय जीवन जगल्यानंतर गंगूबाई यांनी ते वास्तव स्वीकारले. त्यानंतर पुढे जाऊन त्याच माफिया क्वीन झाल्या. त्यानंतर त्यांनी देहविक्री करणाऱ्या आणि अनाथ मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. तर आलियासोबत या चित्रपटात अजय देवगन आणि विजय राज मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत असून चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर २५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महाशिवरात्रीला येणार अमृता फडणवीसांचं नवं गाणं, चाहत्यांची उत्सुकता शिगेला….
मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था
शुटींगच्या पहिल्याच दिवशी घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा