महाराष्ट्र आणि बिहारमध्ये सत्तानाट्य घडल्यानंतर आता आणखी एका राज्यामध्ये सत्तासंकट ओढवलं आहे. ते राज्य म्हणजे झारखंड. झारखंड मधला सत्ताधारी पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसने त्यांच्या ४० आमदारांना रायपूरला पोहोचवण्याची माहिती मिळत आहे.
झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे सुमारे ४० आमदार विशेष विमानाने रायपूरला पोहोचले आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदारांना नवा रायपूर येथील एका रिसॉर्टमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या आमदारांची जबाबदारी कामगार मंडळाचे अध्यक्ष सनी अग्रवाल, राज्य खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष गिरीश देवांगण आणि नागरी पुरवठा महामंडळाचे अध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यासोबतच आमदारांच्या सुरक्षेसाठीही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मेफेअरच्या बाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रिसॉर्टमध्ये कोणालाही परवानगी नाही. तीन थरांमध्ये सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आली आहे. तिसऱ्या थरात एएसपी दर्जाचे अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. दुसऱ्या लेयरमध्ये सीएसपीकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
रायपूरला पोहोचल्यावर मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले, ‘कोणतीही अनुचित घटना घडणार नाही. सत्ताधारी पक्ष कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. धोरणानुसार काम केले जात आहे. त्याच रणनीतीची एक छोटीशी झलक आधी आणि आजही सर्वांनी पाहिली. भविष्यातही अनेक गोष्टी पाहायला मिळतील. राज्यातील कारस्थान करणाऱ्यांना सत्ताधारी उत्तरे देतील.’
दरम्यान, हेमंत सोरेन यांनी स्वत: ला दगड खाणपट्टा दिल्याचा आरोप भाजपनं केला होता. सोरेन यांच्याकडेच खाण आणि वनमंत्रिपद आहे. लोकप्रतिनिधी आणि लाभ कार्यालय १९५१ च्या कलम ९ ए चा आधार घेत भाजपनं सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.